वाल्मिक कराड सुटणार? वकिलांचा दावा काय?
मोठी बातमी समोर येत आहे, आज बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर बीड जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकरणावर बोलताना वाल्मिक कराडच्या वकिलाकडून मोठा दावा करण्यात आला आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, आज बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर बीड जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडने न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मी निर्दोष असून, संतोष देशमुख यांच्या खुनाशी आणि खंडणीशी माझा काहीही संबंध नसल्याचा दावा त्याने आपल्या अर्जामध्ये केला आहे. तसेच आपल्याला निर्दोष सोडण्यात यावं अशी मागणी देखील त्याने आपल्या अर्जामध्ये केली आहे. दरम्यान या सर्व प्रकरणावर आता वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले खाडे?
आज चार्ज दाखल करण्यासाठीची तारीख होती, आरोपी नंबर एक वाल्मिक कराड याचा डिस्चार्ज अर्ज दाखल करण्यात आला आहे. आमच्या म्हणण्यानुसार वाल्मिक कराड याचा या गुन्ह्यात सहभाग नाही. सरकारी पक्षानं जे कथन मांडलं आहे, त्यानुसार पुरावे गोळा करून चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. तपासी यंत्रणांनी बाजू मांडली आणि पुरावे दिले, मात्र ते आणखी सिद्ध झालेले नाहीत. आम्ही कोणताच अर्ज माघे घेतलेले नाही, मात्र डिस्चार्ज अर्ज दिला आहे, पुराव्याचे आधारे आम्हाला वाटतं की वाल्मिक कराड सुटेल, या प्रकरणात गोवण्यासाठी हे सर्व सुरू आहे. संपत्ती सील करण्याचा अर्ज आला आहे, पण हा अर्ज कायद्याने योग्य आहे का हे मांडणार आहोत, मी फक्त वाल्मीक कराडची बाजू मांडत आहेत, इतरांचे वकील वेगळे आहेत, असं खाडे यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आज खेळीमेळीत सुनावणी झाली. लढाई करावी असं काही नसतं, आम्ही भूमिका मांडली. न्यायालयात सादर केलेले पुरावे ओपन केलेले नाहीत. उज्वल निकम यांचं प्रेशर येत नाही, ते त्यांची भूमिका मांडतात. आम्ही आमची भूमिका मांडतो. अद्याप आरोप सिद्ध झालेले नाहीत, या प्रकरणात बऱ्याच अफवा आहेत, मोठे आरोपी आका वगैरे असं काही नाही, न्यायालयाने कुणाला दोषी ठरवले नाही, त्यामुळे आधीच काही ठरवणे योग्य नाही, असंही यावेळी खाडे यांनी म्हटलं आहे.