बीडः मंगळवारी रात्री बीडमधील नांदूरघाट, इमामपूर आणि शहरातील काही गोडाऊनवर केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत (Pankaj Kumawat) यांनी छापे मारले. यात लोखा रुपयांच्या गुटख्यासह 33 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Gutkha Seized) करण्यात आला. दरम्यान या गुटखा तस्करी प्रकरणात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंटलिक खांडे (Kundlik Khande) यांचे नाव समोर आले असून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी गुटखा गोदामावर छापा टाकल्यानंतर खांडे यांनी तिथे उपस्थित असलेल्या आपल्या माणसांनान फोन करून ‘पोलिसांना सांगा, हा कुंडलिक खांडेंचा गुटखा आहे, तिथून निघून जा’ असे म्हणत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. एसपी आर. राजा यांनी या माहितीला दुजोरा दिला. केज तालुक्यात अवैध गुटखा विक्रीवर छापासत्र सुरु करण्यात आले आहे. पोलिसांनी मंगळवारी नांदूरघाट येथील एका किराणा दुकानावर छापा टाकून गुटखा जप्त केला होता. अधिक चौकशी केली असता हा गुटखा बीड व इमामपूर येथून आणल्याचे उघड झाले. कुमावत यांच्या पथकाने बीडमध्ये छापेमारी केली असता, तेथे 33 लाख 81 हजार 494 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणात खांडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी दिली आहे. या प्रकरणात एकूण चौघांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी गुटखा प्रकरणाशी माझा संबंध नाही, असे म्हटले. मला एका शिवसैनिकाचा फोन आला. महिलांनाही पोलीस अटक करत असल्याचे तो म्हणाला. मी घटनास्थळी गेलो. गुटखा माफियांना अटक करा, मात्र त्यांच्या घरातील महिलांना अटक का करता, असा जाब विचारल्याने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला गेला, अशी प्रतिक्रिया कुंडलिक खांडे यांनी दिली.
इतर बातम्या-