राज्यातील दोन मोठे मोठे पक्ष फुटल्यानंतर दिवंगत विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटना फुटली आहे. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे बाहेर पडले आहेत. तानाजीराव शिंदे स्वत:ची नवीन संघटना काढणार आहेत. शिवसंग्राम संघटनेतील हजारो कार्यकर्ते आता तानाजीराव शिंदे यांच्या संघटनेसोबत जाण्याच्या तयारीत आहेत. रायगडावर जाऊन तानाजीराव शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह शिवरायांचे दर्शन घेतले. तानाजीराव शिंदे उद्या रविवारी नवीन संघटनेची घोषणा करणार आहेत.
कराडमधील माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर तानाजीराव शिंदे आपल्या नवीन संघटनेच्या नावाची घोषणा करणार आहेत. शिवसंग्राम मध्ये ज्योती मेटे यांच्या एकाधिकारशाहीमुळे संघटनेतील अनेक पदाधिकारी बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समजत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधी शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा ज्योती मेटे यांना मोठा धक्का बसला आहे. ज्योती मेटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभा निवडणुकीची मी तयारी करण्यासाठी मतदार संघात फिरत आहे. शिवसंग्राम विधानसभा निवडणूक लढविणार आहे. कोणाच्या व्यासपीठावर निवडणूक लढविणार हे अद्याप ठरले नाही. शिवसंग्राम हा वेगळा पक्ष आहे. राज्यात कोणत्याही पक्षाची भूमिका स्पष्ट नाही. त्यामुळे आम्हीही त्याच वेळी भूमिका स्पष्ट करू. बीडसह पाच विधानसभा जागेवर आम्ही निवडणूक लढणार आहोत. तशी आमची प्राथमिक चाचपणी झाली आहे. मराठवाडा विदर्भ आणि कोकण मध्ये तयारी पूर्ण झाली आहे. आता आमचे लक्ष पुणे आहे. जरांगे पाटील यांना आमचे शिष्ट मंडळ भेटून आले आहे. त्यांनी राजकीय भूमिका स्पष्ट केली तर आम्ही त्यांच्याकडे दावेदारी करू असं ज्योती मेटे यांनी म्हटलं आहे.
राजकीय वाटचाल करीत असताना परस्पर संमती वर आमचा भर असणार आहे. समान कार्यक्रम ठरले तर आम्ही सोबत राहण्याचे निश्चित करणार आहोत. धनंजय मुंडे पालकमंत्री आहेत, त्यांचं विधान गांभीर्याने केलं असेल असं आपल्याला समजावे लागेल. निवडणुकीत प्रत्येक जण अशी दावेदारी करत असतो. उद्या मीही म्हणेन की शिवसंग्रामच्या बीड जिल्ह्यातून तीन जागा निवडून आणू शकते. रणधुमाळीत प्रत्येक समोरचा उमेदवार आव्हानात्मक असतो. मात्र बीडकरांनी आता विचार करायचा आहे की किती वर्ष क्षीरसागर यांचा नारा लावायचा आहे? असंही ज्योती मेटे म्हणाल्या.