बीड : अवैध गर्भपात प्रकरणात आरोपी असलेल्या नर्स (Nurse)चा मृतदेह आढळल्याने बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे. सीमा सुरेश डोंगरे असं या आरोपी मयत नर्सचं नाव आहे. बीडच्या पाली येथील बिंदुसरा धरणात या नर्सचा मृतदेह आढळला आहे. नर्सची हत्या (Murder) झाली आहे की आत्महत्या (Suicide) केली ? हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर खरे कारण समोर येईल. अवैध गर्भपात प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एका आरोपीचा मृतदेह आढळल्याने या प्रकरणाचे गूढ अजून वाढले आहे. पोलीस तपासात अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
बीडमध्ये बक्करवाडी येथील सीता गाडे या महिलेचा अवैध गर्भपात करताना गर्भाशयाला जखम होऊन रक्तस्त्राव वाढल्याने मृत्यू झाला होता. महिलेच्या मृत्यूनंतर हे अवैध गर्भपाताचं प्रकरण उजेडात आलं. यानंतर महिलेच्या चार नातेवाईकांसह अवैध गर्भलिंग चाचणी करणाऱ्या एजंड महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. महिलेच्या नातेवाईकांच्या जबाबावरुन ही बीडमधील एका टेक्निशियनच्या मध्यस्थीने या नर्सकडे गर्भपात केल्याचे पोलिसांनी कळले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित लॅब टेक्निशियनला काल रात्री अटक केले. त्याची चौकशी केली असता मयत नर्स सीमा डोंगरे यांच्याकडे महिलेला गर्भपातासाठी नेल्याचे कळले. त्यानुसार पोलिसांनी टेक्निशियनसह नर्स सीमा डोंगरे यांच्यावर गुन्हा दाखल केला.
आज सकाळी पोलीस सीमा डोंगरे यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता त्या घरी सापडल्या नाहीत. यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान पोलिसांनी बिंदुसरा धरणात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी धरणाकडे धाव घेत महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता मयत महिला हीच आरोपी नर्स सीता डोंगरे असल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. ही हत्या आहे की आत्महत्या हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. (The body of a nurse accused in an illegal abortion case was found in Beed)