Ahmednagar : नगर-परळी रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा पूर्ण, बहुचर्चित असलेल्या या रेल्वे मार्गाची अशी ‘ही’ कहाणी..!
नगर-परळी रेल्वेमार्गाने केवळ दोन जिल्हेच नाही तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा जोडला जाणार होता. त्यामुळे 1984 साली हा रेल्वे मार्ग व्हावा अशी मागणी करण्यात आली होती.
कुणाल जायकर, प्रतिनीधी अहमदनगर : ज्याप्रमाणे मराठवाड्यात (Marathwada) लातूरला उजनीच्या पाण्याचा विषय गाजत आहे अगदी त्याचप्रमाणे बीडकरांचे रेल्वेचे (Beed Railway) स्वप्न सत्यामध्ये केव्हा उतरणार असे होते. गेल्या 38 वर्षापासून चर्चेत असलेल्या नगर-परळी (Nagar-Parali) रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा पूर्ण होत आहे. अहमदनगर ते आष्टी हा 67 किमीचा पहिला टप्पा पुर्णत्वाला आला आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये हिरवा झेंडा दाखवून या रेल्वेमार्गाचे उद्घाटन होणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर ते परळी ह्या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण व्हावे अशी मागणी होती. या रेल्वे मार्गाचा मुद्दा केवळ निवडणुकांमध्येच गाजत होता. अनेक या रेल्वेमार्गाचे राजकारण करीत सत्ताही मिळवली पण प्रश्न मात्र, कायम राहिला होता. आता त्याच रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे.
नगर-परळी रेल्वेमार्गाने केवळ दोन जिल्हेच नाही तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा जोडला जाणार होता. त्यामुळे 1984 साली हा रेल्वे मार्ग व्हावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर कायम दुर्लक्षित राहिलेल्या या मार्गाचे अखेर उद्घाटन होत आहे.
दरम्यानच्या काळात, भाजपचे गोपीनाथ मुंडे आणि कॉंग्रेसचे विलासराव देशमुख यांनी केंद्रीय स्थरावर मागणी लावून धरल्याने अखेर या मार्गाला मंजुरी मिळाली होती. त्यानंतरही अनेक अडचणींची शर्यत पार करीत अखेर उद्या उद्घाटन होत आहे.
दळणवळण आणि शेतीमालाच्या वाहतूकीसाठी या रेल्वेचा उपयोग होणार आहे. मरठावाड्यातील शेतीमालाला योग्य मार्केट मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसा हे ठरलेलेच होते. पण आता रेल्वेमुळे शेतीमाल वाहतूकीचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.
शेतीमालाबरोबर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा कल हा पुण्याकडे आहे. आतापर्यंत मुलभूत सोई-सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. आता रेल्वेच सुरु होत असल्याने किमान आष्टी आणि परिसरातील विद्यार्थ्यांचा तरी प्रश्न मार्गी लागणार आहे.