नवी दिल्ली : राज्यातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाच लक्ष लागलं आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. बरेच महिने या खटल्यावर न्यायालयात सुनावणी सुरु होती. अखेर आज या खटल्यावर सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे.
शिंदे गटाचे 16 आमदार पात्र ठरतात, की अपात्र यावर बरच काही अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालायच्या निकालावर राज्यातील राजकारणाची पुढची दिशा ठरु शकते. त्यामुळे या निकालाची सगळ्यांनाच उत्सुक्ता आहे.
निकालाआधी खूप महत्वाचे बोलले
आज सर्वोच्च न्यायालयात निकाल वाचन होणार आहे. त्याआधी शिंदे-फडवणीस सरकारमधील उद्योग मंत्री उदय सामंत यांनी खूप महत्वाच विधान केलय. निकालानंतर भरपूर घडामोडी घडतील, अस सूचक विधान त्यांनी केलय. “उद्धव ठाकरे गटाचे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. याची प्रचिती एक-दोन महिन्यात येईल. मागचे पंधरा दिवस सांगतोय त्यावर शिक्कामोर्तब होईल” असं उदय सामंत म्हणाले.
संजय राऊतांवर काय म्हणाले?
आज निकालाच्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आलीय. त्यावर उदय सामंत यांनी, नोटीस आली असल्यास, योगायोग समजावा असं उत्तर दिलं. निकालाआधी खासदार, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या टि्वटबद्दल प्रतिक्रिया विचारली. त्यावर, नव कवींना माझ्या शुभेच्छा असं ते म्हणाले.
“रोज सकाळी राऊंताची टेप वाजते. शिल्लक उरलेल्या आमदार-खासदारांना सांभाळण्यासाठी कुठल्यातरी नेत्याने बोललं पाहिजे, म्हणून ते बोलतात. संजय राऊंताव्यतिरिक्त महाराष्ट्रात अनेक विकासाचे मुद्दे आहेत” असं उदय सामंत म्हणाले.