बेळगावात पुन्हा एकदा भगवा फडकवण्याचा प्रयत्न , कानडींकडून कार्यकर्त्यांना अटक आणि सुटका; वातावरण तापणार?
बेळगाव : मागील 62 वर्षांपासून बेळगाव (Belgaum), कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा लढा सुरु आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने हा लढा आणखी तीव्र केला जाईल असे काही दिवसांपूर्वी बोलून दाखवले होते. या पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिकेसमोर भगवा फडकवण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी मनपासमोर भगवा फडकवण्याचा प्रयत्न करताना जळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (Maharashtra Ekikaran […]
बेळगाव : मागील 62 वर्षांपासून बेळगाव (Belgaum), कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा लढा सुरु आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने हा लढा आणखी तीव्र केला जाईल असे काही दिवसांपूर्वी बोलून दाखवले होते. या पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिकेसमोर भगवा फडकवण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी मनपासमोर भगवा फडकवण्याचा प्रयत्न करताना जळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (Maharashtra Ekikaran Samiti) माजी महापौर, माजी उपमहापौर आणि नगरसेविका यांना अटक करुन त्यांची लगेच सुटका करण्यात आली. (Belgaum Maharashtra Ekikaran Samiti activist arrested by Karnataka police)
महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेत सुटका
बेळगाव महानगरपालिकेसमोर अनधिकृतपणे लावण्यात आलेला ध्वज काढण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आज सोमवारी (8 मार्च) भव्य निषेध मोर्चा काढला. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव मनपासमोर भगवा ध्वज फडकविण्याचा प्रयत्न केला. ध्वज फडकवत असताना, कर्नाटक पोलिसांनी 6 महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांनतर या मोर्चेकऱ्यांची पोलिसांनी लगेच सुटका केली. हा प्रकार घडल्यानंतर मोर्चेकऱ्यांची धास्ती घेत पोलीस प्रशासनाने शहरात बंदोबस्त वाढविला होता.
नेमका प्रकार काय?
धर्मवीर संभाजी महाराज चौक येथून मोर्चाला प्रारंभ झाला. दरम्यान महापालिकेवर मोर्चा पोहोचण्यापूर्वीच सरदार हायस्कूल मैदानाजवळ महामोर्चाला रोखण्यात आले. एकीकडे सरदार मैदानामार्गे महामोर्चा निघाला असतानाच दुसरीकडे माजी महापौर सरिता पाटील, उपमहापौर रेणू किल्लेकर व अन्य महिला कार्यकर्त्यांनी घोषणा देत भगवा ध्वज फडकवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ध्वज फडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. नंतर अवघ्या काही तासातच महिलांना सोडूनही देण्यात आले.
पुन्हा वातवरण तापणार?
1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्याची निर्मिती झाली होती. हा दिवस येथील सरकारकडून आनंदोत्सवात साजरा केला जातो. तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून हा काळा दिवस पाळला जातो. यावेळी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्री यांनी काळ्या फिती बांधून संयुक्त महाराष्ट्राच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा आज बेळगाव मनपासमोर भगवा ध्वज पडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले गेले. या प्रकारामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेचा प्रश्न पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या :
वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, ते यायला तयार आहेत का? : संजय राऊत
एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांशी फोनवरुन संवाद, बेळगावसह सीमाभाग लवकरच महाराष्ट्रात, शिवसेनेची डरकाळी
बेळगावकडे जाणारा शिवसैनिकांचा मोर्चा कर्नाटक पोलिसांनी अडवला
(Belgaum Maharashtra Ekikaran Samiti activist arrested by Karnataka police)