Bhandara Hospital Fire | 10 नवजात बालकांचा मृत्यू, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे?
रुग्णालयाचं फायर ऑडिट झालं नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सकांनी ही माहिती दिली आहे.
भंडारा: जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीला आणि 10 बालकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. त्यातच टीव्ही 9 मराठीला मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्हा रुग्णालयाची इमारत जुनी आहे. मात्र, या रुग्णालयाचं फायर ऑडिट झालं नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सकांनी ही माहिती दिली आहे. आपण गेल्या 6 वर्षांपासून इथं कार्यरत आहोत. तेव्हापासून फायर ऑडिट झालं नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. (fire audit of Bhandara district hospital has not been done)
आग लागली त्यावेळी शिशु केअर युनिटमध्ये एकही कर्मचारी उपस्थित नव्हता का? असा प्रश्न आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल यांना यांना विचारला असता त्यांनी दोन्ही कक्षांमध्ये नर्सिंग स्टाफ युनिट होतं. तिथं सर्व कर्मचारी उपस्थित होते, असं सांगितलं. मानवी चुकीमुळं ही दुर्घटना घडली का? असा प्रश्न विचारला असता, यात मानवी चूक असेल असं आतातरी वाटत नाही. पण चौकशीनंतर सर्वकाही समोर येईल, असंही संजय जयस्वाल म्हणाले.
आरोग्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा
रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या बाळांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तसंच संध्याकाळी 5 वाजता आरोग्यमंत्री स्वत: भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट देणार आहेत. टोपे यांनी संपूर्ण घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून घेतली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं त्यांनी म्हटलंय. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा करुन अन्य बाळांना दुसरीकडे हलवण्याचे आणि लागेल ती मदत पुरवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. या दुर्घटनेत 3 बाळांचा होरपळून तर 7 बाळांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या मृत्यूची घटना अत्यंत दुःखद असून व्यथित करणारी आहे. या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.या घटनेची संपूर्ण चौकशी करण्यात येईल.
— Rajesh Tope (@rajeshtope11) January 9, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून चौकशीचे आदेश
“भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे . त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत”, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आली आहे.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 9, 2021
संबंधित बातम्या:
Bhandara Hospital Fire | “माझ्या बाळाला एकदा तरी पाहू द्या”, बाळांच्या आई आणि नातेवाईकांची आर्त हाक
fire audit of Bhandara district hospital has not been done