“नाना पटोलेंनी मला निवडणुकीची तयारी करायला सांगितली आणि ऐनवेळी…” काँग्रेस पदाधिकाऱ्याचा गंभीर आरोप
आता एका अपक्ष उमेदवाराने महाविकासआघाडीतील नेत्यावर गंभीर आरोप केले आहे. नाना पटोलेंमुळे माझे राजकीय जीवन उद्धवस्त झाले, असे त्याने म्हटले आहे.
Premsagar ganvir Allegation On Nana Patole : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर सध्या सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता एका अपक्ष उमेदवाराने महाविकासआघाडीतील नेत्यावर गंभीर आरोप केले आहे. नाना पटोलेंमुळे माझे राजकीय जीवन उद्धवस्त झाले, असे त्याने म्हटले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मला उमेदवारीची तयारी करण्यास सांगितली होती. गेल्या ३५ वर्षांपासून मी पक्षाशी एकनिष्ठ असल्याने मला उमेदवारी मिळेल असा विश्वास होता. मात्र, ऐनवेळी मला डावलण्यात आले. त्यांच्यामुळेच माझे राजकीय जीवन उद्ध्वस्त झाले, असा गंभीर आरोप भंडारा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रेमसागर गणवीर यांनी केला. नुकतंच त्यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी हे विधान केले.
“माझे राजकीय जीवन उद्धवस्त झाले”
“मी गेल्या ३५ वर्षांपासून काँग्रेस पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून काम केलं आहे. या ३५ वर्षांच्या कार्यकाळात मी पक्षाला कधीही सोडून गेलो नाही. काँग्रेसचे अनेक नेते हे पक्षाला सोडून गेले. पक्षश्रेष्ठी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच मला उमेदवारीची तयारी करण्यास सांगितली. गेल्या ३५ वर्षांपासून पक्षाचा एकनिष्ठ पाईक असल्याने आपल्याला उमेदवारी मिळेल, याचा विश्वास होता. पण नाना पटोले यांनी माझ्यावर अन्याय केला. त्यांच्यामुळे माझे राजकीय जीवन उद्धवस्त झाले”, असे प्रेमसागर गणवीर म्हणाले. यावेळी बोलताना ते ढसाढसा रडले.
“पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा”
यामुळेच मी पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन दलितांच्या अस्मितेच्या रक्षणासाठी अपक्ष उमेदवार म्हणून ही विधानसभा निवडणूक लढत आहे, असे प्रेमसागर गणवीर यांनी म्हटले. प्रेमसागर गणवीर हे भंडारा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते जोरदार प्रचार करताना दिसत आहेत.
भंडाऱ्यात पूजा ठवकर विरुद्ध नरेंद्र भोंडेकर
दरम्यान भंडारा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने पूजा ठवकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिवसेना – महायुतीकडून नरेंद्र भोंडेकर यांना उमदेवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भंडाऱ्यात पूजा ठवकर विरुद्ध नरेंद्र भोंडेकर अशी लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघात अनेकांनी बंडखोरी केल्याने अपक्षांचेही मोठे आव्हान पाहायला मिळणार आहे.