Medical : ३८ वर्षांचा योद्धा अखेर गेला, छोट्या-छोट्या पेशींने घेतला दुलिचंदचा बळी
१७ सप्टेंबर २०२३. पहाटे पाच वाजले. आतेगाववरून मोबाईलवर फोन आला. राजू पेंटर बोलतो. दुलिचंद कळपते रात्री साडेदहाला गेला. मनात धस्स झालं. गेल्या वर्षभरापासून कर्करोगाशी झुंजणारा योद्धा अखेर गेला. कालच आईनं सांगितलं होतं. गेल्या आठ दिवसांपासून दुलिचंदने खाणंपिणं सोडलं. तेव्हाच वाईट वाटलं. पण, शेवटी जे व्हायचं ते होतं.
भंडारा : जिल्ह्यातील आतेगाव हे आदिवासीबहुल गावं. आतेगाव नागझिऱ्याच्या जंगलात कोअर झोनला लागून आहे. दहा वर्षांपूर्वी हे गाव नागझिरा अभयारण्यात गेले. तेव्हापासून येथील युवकांचा रोजगार हिरावला गेला. आधी जंगलावर निर्भर असलेले युवक आता रोजगारासाठी शहरात जाऊ लागले. सध्या ७०० लोकसंख्या असलेल्या आतेगावातील ४०-५० युवक रोजगारासाठी शहरात गेले. शहरात सहा महिने काम करतात. पैसे कमवतात. नंतर गावात येतात. पण, गावात रोजगार उपलब्ध करावा, असं ना लोकप्रतिनिधींना वाटलं. ना सरकारी योजना शहरातील स्थलांतरण थांबवू शकल्या. नेतेमंडळी फक्त आश्वासनं देतात. पण, गावातील रोजगारासाठी काही ठोस उपाययोजना करत नाही. सरकारी यंत्रणा कुचकामी आहे. जंगल विभाग तर फक्त प्राण्यांच्या सुरक्षेसाठी काम करतं. पण, आजूबाजूच्या गावात काही रोजगाराची साधने मिळतील का, याकडं कुणाचंही लक्ष नाही. असंच काहीस चित्र नागझिरा अभयारण्याच्या आजूबाजूला असलेल्या २४ कोअर झोनमधील गावांत आहे.
शहरात पैसा मिळतो. पण, शहरातील कंपन्यांचा धूर. तेथील प्रदूषित अन्न. माणसाला पोखरून टाकते. दुलिचंदही गेल्या दहा वर्षांपासून कंपन्यांमध्ये जात होता. वेळीअवेळी खाणंपिणं. बारा-बारा तास काम करणं. दीडपट रोजी मिळवून पैसे कमवणं. यामुळे त्याच्या शरीरावर विपरित परिणाम झाले. दोन वर्षांपूर्वी दुलिचंदच्या गळ्यात गाठ आली. सुरुवातीला आजूबाजूच्या डॉक्टरांकडे गेला. साकोलीतील एका डॉक्टरला संशय आला. त्यांनी कँसर असण्याच्या शक्यता व्यक्त केली.
दुलिचंद सहा फूट उंच. ८० किलो वजनाचा धाडधिप्पाड माणूस. वय ३८ वर्षे. कोणतीही काम बेधडक करायचा. मिलट्री जवानासारखं व्यक्तिमत्त्व. क्रिकेटचे मैदान असो की, कोणतही काम तो योद्ध्यासारखा तुटून पडायचा. पण, कँसरच्या छोट्या-छोट्या पेशींनी त्याला घेरलं. अनेक छोट्या पेशी एकत्र आल्या आणि त्याचा घात केला.
जामठ्यातील कँसर इंस्टिट्यूटमध्ये उपचार
सुमारे एका वर्षांपूर्वी दुलिचंद नागपुरातील सर्वात मोठ्या जामठ्याजवळील कँसर रुग्णालयात गेला. तिथं उपचार घेतले. त्यासाठी तो त्याच्या दुधारा येथील साळ्यासोबत बाईकने नागपूरला यायचा. केमोथेरपी घ्यायचा. सहा केमो झाले. पण, दुलिचंदच्या कँसरच्या एका गाठीच्या दोन झाल्या. दोनाच्या चार झाल्या. संपूर्ण तोंड कँसरच्या गाठींनी ग्रासले. गेल्या सहा महिन्यांपासून तोंडाला छिद्र पडले असल्यानं दुलिचंदला खाता-पिता येत नव्हते.
दुलिचंदला घरी बायको आणि पाच वर्षांचा मुलगा आहे. राजू कळपते (पेंटर) यांनी दुलिचंदच्या उपचारासाठी बरेच प्रयत्न केले. स्वतःच्या खिशातील पैसे खर्च केले. आयुर्वेदिक, जडीबुटी, नागपुरातील मेडिकल अशा विविध ठिकाणी उपचारासाठी नेले. पण, कँसर काही कमी होईना. ज्याने जिथं सांगितलं तिथं दुलिचंदला उपचारासाठी नेण्यात आले. पण, कँसरच्या पेशी काही कमी होईना. कँसर दिवसेंदिवस वाढतच होता.
सहा महिन्यांच्या संघर्षाचा शेवट
जीवन जगण्यासाठी खावं लागलं. पण, तोंडात टाकलेले अर्धे अन्न खाली पडत होते. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून दुलिचंद लिक्वीड फूड घेत होता. पाणी, वरण, आंबील यांचा वापर करून जगत होता. आजार बळावत गेला. कोणत्याच उपचाराचा गुण त्याच्या शरीरावर लागेना. त्यामुळे तो खचला होता. गेल्या आठ दिवसांपासून अन्नपाणी सोडले होते. अखेर दुलिचंदसारखा योद्धा गेल्याची बातमी धडकली.