एक रुपया द्या आणि धूमधडाक्यात लग्न उरकून घ्या; ही सुविधा येथे आहे उपलब्ध
कमी खर्चात लग्न कसं करता येईल म्हणून सामूहिक विवाह सोहळे साजरे केले जातात. त्याठिकाणी कमी शुल्क घेऊन विवाहाचा विधी पार पाडला जातो. पण, भंडाऱ्यातील एक संघटनेने फक्त एक रुपये नोंदणी घेऊन विवाह सोहळा पार पाडला.
भंडारा : लग्न ही खर्चिक बाब. प्रत्येकजण आपआपल्या ऐपतीनुसार खर्च करतो. पण, प्रत्येकजणांकडे लग्नासाठी पैसे असतील, असं नाही. अशावेळी समाज काय म्हणून याची भीती त्यांना वाटते. त्यामुळे कर्ज काढून लग्न समारंभ पार पाडला जातो. पण, ते कर्ज फेडणे कठीण होऊन बसते. अशावेळी कमी खर्चात लग्न कसं करता येईल म्हणून सामूहिक विवाह सोहळे साजरे केले जातात. त्याठिकाणी कमी शुल्क घेऊन विवाहाचा विधी पार पाडला जातो. पण, भंडाऱ्यातील एक संघटनेने फक्त एक रुपये नोंदणी घेऊन विवाह सोहळा पार पाडला. या विवाह सोहळ्याची चर्चा सध्या सुरू आहे. शिवाय वधू-वराला भेटवस्तू मोफत देण्यात आल्या. यामुळे वधू-वरांच्या आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर दिसून आली.
यामुळे शेतकरी त्रस्त
भंडारा जिल्ह्यात धान उत्पादक आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी भरपूर प्रमाणात आहे. मात्र मागील वर्षी आलेला महापूर, अतिवृष्टिने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याचा फटका शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, कामगार, चिल्लर भाजीपाला विक्रेते यांना बसला आहे. एकीकडे वयात आलेली मूल-मुली आणि दुसरीकडे घरात पैसा शिल्लक नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त आहे.
दहा जोडपी विवाहबद्द
ही बाब लक्षात घेता भंडारा शहरातील एकमेव बीटीबी भाजी मार्केट संचालकांनी मात्र 1 रुपये माफक शुल्कात विवाह सोहळा पार पाडला. शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब , कामगार, चिल्लर भाजीपाला विक्रेते यांच्या मुला- मुलींसाठी सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला. बघता बघता निमंत्रण पत्रिका छापून काल रामनवमीच्या पर्वावर सामूहिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी 10 जोडपी विवाहबद्ध झालीत.
या भेटवस्तू देण्यात आल्या
या जोडप्याला आलमारी,कुलरसह गिफ्ट रुपात आंदणही दिले आहे. बीटीबी मार्केटच्या अभिनव कल्पनेची चर्चा जिल्हाभर होत आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यात जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिकांनी हजेरी लावली. या विवाह सोहळ्याची चर्चा सध्या सुरू आहे. कमीत-कमी खर्चात विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी ही एक चांगली संधी होती. गरजूंना याचा लाभ घेतला. पुढच्या वर्षीसुद्धा ही सुविधा उपलब्ध राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितलं.