Bhandara Tiger | भंडाऱ्यातील आलेसुरात वाघाची दहशत, 8 जनावरांना बनविले भक्ष्य, वाघाचा बंदोबस्त कसा करणार?
आर्थिक नुकसान ही सहन करावे लागत आहे. त्यामुळे आता या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे. अनिल नरखांडे व विकास लोखंडे यांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
भंडारा : जिल्ह्याच्या तुमसर (Tumsar) तालुक्यातील आलेसुर गावात वाघाची (Tiger) प्रचंड दहशत पहायला मिळत आहे. चरायला नेलेल्या जनावराला हा वाघ भक्ष्य बनवित आहे. त्यामुळे गावातील तब्बल 7 ते 8 पाळीव जनावरांना या वाघाने फडशा पाडला आहे. सतत होणारे हे नुकसान लक्षात घेता पशुपालकाद्वारे वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे. आलेसूर गाव हे जंगलालगत असलेले गाव आहे. येथील धान उत्पादक शेतकऱ्यांनी (Farmers) शेतीला जोड़ धंदा म्हणून पशुपालन सुरु केले आहे. मात्र गावात पशुंसाठी चारा उपलब्ध नाही. त्यामुळं पशुपालन आपले पशु चराईसाठी जंगलालगत नेतात. महिन्याभरापासून एक वाघाने येथे डेरा टाकला आहे. वाघाने या पाळीव जनावरांना आपले भक्ष्य बनविले. विशेष म्हणजे महिन्याभरात या वाघाने 7 ते 8 जनावरांचा फडशा पाडला आहे. यामुळे पशुपालकात दहशत निर्माण झाली आहे.
जनावरांचा बळी घेणारा वाघ
आर्थिक नुकसान ही सहन करावे लागत आहे. त्यामुळे आता या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे. अनिल नरखांडे व विकास लोखंडे यांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. आलेसूर हे जंगलालगत आहे. त्यामुळं येथे वाघाचा वावर आहे. हा वाघ जनावरांचा बळी घेत असतो. माणसाचा बळी घेण्यासही मागेपुढं पाहणार नाही. त्यामुळं या वाघाचा बंदोबस्त वनविभागानं करावा, अशी मागणी जोर धरत आहे. एकीकडं नागझिरा-नवेगाव जंगलात चार वाघ सोडण्यात येणार आहेत. दुसरीकडं आधीच अस्तित्वात असलेले वाघ जनावरांचा फडशा पाडत आहेत. त्यामुळं हे नवीन वाघ येथे सोडू नका, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
जंगलात वाघ सोडण्याला विरोध
चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी येथील चार वाघांना नागझिरा-नवेगाव जंगलात सोडण्याचा निर्णय राज्याच्या वनविभागाने घेतला आहे. राज्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. मे महिन्याच्या अखेरीस यातील दोन वाघिणींना या व्याघ प्रकल्पात सोडण्याचे संकेत वनखात्याच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिले. नवेगाव-नागझिरा व्याघ प्रकल्पात वाघ आणि वाघिणींची संख्या समांतर नाही. त्यामुळे येथे चार वाघीण सोडून ही संख्या समांतर करण्यासाठी निर्णय घेण्यात आले. या वाघिणी दीड ते दोन वर्षांच्या असून या वाघिणींना काही दिवस खुल्या पिंजर्यात ठेवून मग रेडिओ कॉलर लावून नवेगाव-नागझिरा व्याघ प्रकल्पात सोडले जाईल. बिलाल हबीब हा संपूर्ण प्रकल्प हाताळत आहे. स्वयंसेवी संस्थांचीही यासाठी मदत घेतली जात असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. व्याघ्र प्रकल्पात तृण भक्षी प्राण्यांची संख्या कमी असल्याने काही वन्य जीव प्रेमींनी या प्रक्लपाला विरोध केला आहे.