आणखी एका वाघाचा बळी; गोंदिया पाठोपाठ भंडाऱ्यात गेला टायगर
चार दिवसांपूर्वी गोंदिया-कोहमारा रोडवर एका वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाला. कारच्या धडकेत हा मृत्यू झाला. आता तुमसर वनपरिक्षेत्रात पुन्हा वाघ मृतावस्थेत सापडला.
तेजस मोहतुरे, प्रतिनिधी, भंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात नागझिरा-नवेगावबांध अभयारण्य आहे. या अभयारण्यात वाघांची संख्या वाढावी, असा वनविभागाचा प्लॅन आहे. त्यासाठी महिनाभरापूर्वी ब्रम्हपुरीच्या जंगलातून नागझिऱ्यात दोन वाघिणी सोडण्यात आल्या. वाघांची संख्या वाढून वन्यजीव सृष्टी योग्य पद्धतीने राहावी, असा वनविभागाचा प्रयत्न आहे. पण, हा प्रयत्न अयशस्वी होताना दिसत आहे. कारण चार दिवसांपूर्वी गोंदिया-कोहमारा रोडवर एका वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाला. कारच्या धडकेत हा मृत्यू झाला. आता तुमसर वनपरिक्षेत्रात पुन्हा वाघ मृतावस्थेत सापडला. त्यामुळे वन्यजीवांचे संरक्षण कसे करायचे असा प्रश्न वनविभागापुढे पडला आहे.
शेतात पानांनी झाकून ठेवला वाघाचा मृतदेह
भंडारा जिल्ह्यातील खंदाळ येथील शेतात एक पट्टेदार वाघ पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत आढळला. रतन वाघमारे यांच्या शेतात हा वाघ मृतावस्थेत असल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांना मिळाली. शेतात पाहणी केली असता, शेतातील एका भागात झाडांच्या पानांनी हा वाघ झाकून ठेवला होता.
वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे?
सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यानी भात पिकाची लागवड केली. त्यानंतर किडींचा प्रादुर्भाव होवू नये, म्हणून औषध फवारणी केली होती. कदाचित शेतातून जाताना वाघानं रासायनिक औषधयुक्त पाणी पिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असावा. किंवा वीज प्रवाहाचा करंट लागून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
रासायनिक पदार्थांचा वापर वाढला
मात्र, मृत वाघाचं शवविच्छेदन केल्यानंतरच त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण पुढे येईल. सध्या वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले असून, तपास सुरू आहे. रासायनिक पदार्थांचा वापर वाढल्याने अन्नधान्य दूषित होत आहे. हे विषयुक्त अन्न खाल्याने रोगप्रतिकारकशक्ती कमी होत आहे. परंतु, याचे ज्ञान शेतकऱ्यांना नसल्याने ते रासायनिक पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. यावर निर्बंध आणणे गरजेचे आहे.
फेन्सिंगचं काय?
वनविभाग वन्यप्राणी आणि जंगलावर करोडो रुपये खर्च करते. वन्यजीवांची संख्या वाढल्याने प्राणी गावात येतात. शेतातील पिकांचे नुकसान करतात. शेवटी शेतकरी शेतात करंट लावतात. यामुळे काही वन्यप्राणी मृत्यूमुखी पडतात. वन्यप्राणी जंगलातून शेतात येऊ नये, यासाठी फेन्सिंगची गरज आहे. पण, याकडे वनविभाग केव्हा लक्ष देणार हे समजण्यापलीकडे आहे.