भंडारा : भंडाऱ्यात स्कूल बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला ट्रकने अक्षरशः काही अंतर फरफटत नेलं. समोरुन ट्रकने धडक दिल्याने स्कूल बसचं मोठं नुकसान झाला. या भीषण अपघातातून स्कूल बसमधील 35 विद्यार्थी अगदी थोडक्यात बचावले आहेत. हा अपघात देव्हाडी इथं घडला. वय वर्ष 5 ते 14 वयोगटातील विद्यार्थी स्कूल बसमध्ये होते. या अपघातात काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. सुदैवानं कुणालाही मोठी दुखापत झाली. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळला. मात्र या अपघाताने विद्यार्थ्यांच्या पालकांच्या काळजाचा ठोका चुकलाय.
भंडारा जिल्ह्याच्या तुमसर लगत देव्हाडी रेल्वे उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने समोरुन येणाऱ्या स्कूल बस जोरदार धडक दिली. हा ट्रक (क्र. एमएच 40 सीडी 9357) कोळसा भरून तिरडोकडे जात होता. भरधाव वेगात असलेल्या ट्रक चालकाला वेग नियंत्रित करता न आल्यानं हा अपघात घडला, असं सांगितलं जातंय. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झालाय.
देव्हाडी रेल्वे पुलाच्या पोच मार्गावर भरधाव ट्रकने आधी कारला धडक दिली. त्यानंतर महर्षी विद्या मंदिराच्या स्कूल बसला ट्रकने धडक दिली. धडकेनंतर बस काही अंतरापर्यंत ट्रकने फरफटत नेली. स्कूल बस आणि ट्रकच्या या अपघाताची पोलिसांनी नोंद करुन घेतली असून फरार ट्रक चालकाचा शोध सुरु आहे.
स्कूल बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळला. या बसमधून तब्बल 35 विद्यार्थी प्रवास करत होते. शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना हा अपघात घडला. या अपघातानंतर स्कूल बसमधील विद्यार्थ्यांच्या घाबरगुंडी उडाली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांत विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात होण्याची ही तिसरी घटना आहे.
पुणे मुंबई एक्स्प्रेसवर सहलीवरुन परतत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात झाला होता. खोपोली जवळ ही बस रविवारी उलटली होती. या अपघातात दोघा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. तर परभणी येथे स्कूल बस आणि एसटीचीही समोरा समोर जबर धडक झाली होती. 20 विद्यार्थी असलेल्या स्कूल बसच्या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाले होते. स्कूल बस अपघातांच्या या दोन मोठ्या घटनांना आठवडाही उलटलेला नाही. अशातच भंडारा जिल्ह्यात आणखी एका स्कूल बसचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.