आईने पाहिलं तर दीड वर्षांचं पोटचं पोर टाकीत निपचित पडलेलं, हालचाल शून्य! माऊलीचं काय झालं असेल?
दीड वर्षांचा प्रियांशू अंगणात खेळत होता, आई तोवर अंघोळीला गेला, परत येते तर मुलगा गायब, मग शोधाशोध...
भंडारा : एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गेल्या आठवड्यात एका मुलीचा टाकीत बुडून मृत्यू झाला होता. ही मुलगी अवघ्या दीड वर्षांची होती. गेल्या आठवड्यात घडलेल्या या दु्र्दैवी घटनेनंतर आता पुन्हा एकदा तशीच आणखी एक घटना घडल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय. एक दीड वर्षांचा मुलगा घरातल्यांची नजर चुकून पाण्याच्या टाकीजवळ गेला आणि त्यात पडला. त्यानंतर आजूबाजूला कुणीच नसल्यानं त्या चिमुरड्याचा रडण्याचा आवाज, मदतीसाठी त्याने फोडलेला टाहो देखील कुणाला ऐकू आला नाही. अखेर या दीड वर्षांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीतच बुडून गुदमरुन मृत्यू झाला. या घटनेनं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. ही दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात घडली. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेत मृत्यू झालेल्या दीड वर्षांच्या बाळाचं नाव प्रियांशू मेहर असं आहे.
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात डोंगरगाव इथं मेहेर कुटुंबीय राहतात. या कुटुंबातील आई आणि दीड वर्षांचं बाळ घरात होतं. दीड वर्ष वयाचा प्रियांशी घरासमोर अंगणात खेळत होता. मुलगा खेळतोय हे पाहून तोवर अंघोळ करुन येता येईल, अशा विचाराने आई लगेचच घरात गेली.
दरम्यान, घरातल्यांची नजर चुकवून प्रियांशू अंगणात खेळता खेळता नळाच्या टाकीजवळ गेला. पण अंघोळ करुन जेव्हा प्रियांशूची आई घरी परतली तेव्हा तिला प्रियांशू कुठेच दिसून आला नाही. त्यामुळे त्याच्या आईला चिंता वाटू लागली. शोधाशोध सुरु केली. इतक्यात प्रियांशूच्या आईची नजर पाण्याच्या टाकीजवळ गेली. मन घट्ट करुन प्रियांशूची आई पाण्याच्या टाकीपाशी पाहण्यासाठी गेली असता तिला ज्याची शंका होती, तेच खरं झालं!
प्रियांशूचा नळाच्या पाण्याच्या टाकीत कोसळून बुडाल्याने मृत्यू झाला होता. चिमुकल्याचा झालेला करुण अंत पाहून आईला अश्रू आवरता आले नाहीत. प्रियांशूच्या आईने आरडाओरडा केला. शेजाऱ्यांनी काय झालंय, हे पाहण्यासाठी लगेचच धाव घेतली. प्रियांशूची काहीच हालचाल होत नाही हे पाहून शेजाऱ्याांच्या मदतीने त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथे नेईपर्यंत बराच उशीर झाला होता. रुग्णालयात नेल्यानंतर प्रियांशूला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
प्रियांशूच्या मृत्यूनं त्याच्या आईवर मोठा आघात झाला आहे. चिमुकल्या मुलाचा मृतदेह पाहून आईने फोटडलेला टाहो काळीज पिळवटून टाकणारा होता. प्रियांशूच्या मृत्यूने अन्य कुटुंबीयांसह संपूर्ण गाव शोकसागरात बुडालंय. दरम्यान, भंडाऱ्यातीलच लाखांदूर तालुक्यात गेल्या आठवड्यापूर्वी एक दीड वर्षींय मुलीचाही अशाच प्रकारे टाकीत बुडून मृत्यू झालेला. या दोन्ही घटनांनी लहान मुलांवर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं असल्याचं अधोरेखित केलंय.