भंडारा : होळीचा सण जवळ आला की, आठवण येते ती घानमाकडीच्या खेळाची. भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात घानमाकडचा (कुरकुंजा) खेळ खेळला जातो. जिल्ह्यातील किताडी (बरड किंना) या गावात आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत घानमाकड खेळण्याच्या आनंद घेतला. पळसाच्या वक्राकार लाकडापासून गोलाकार फिरणाऱ्या आणि कर-कर असा आवाज येणाऱ्या या घानमाकडीबद्दल बालकात विशेष आकर्षण आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातही आज हे खेळ ग्रामीण भागात घानमाकड खेळले जातात. माग महिना संपताच फाल्गून महिन्याची सुरुवात होऊन होळीची चाहूल लागते. होळीच्या एक महिना अगोदरपासूनच तयारी सुरू होते. शेणापासून चाकोल्या तयार केल्या जातात. तसेच गावातील उत्साही मुले घानमाकड तयार करतात.
गावालगतच्या जंगलात जाऊन पळसाचे वक्राकार लाकूड आणले जाते. लाकडाचा ओंडका जमिनीत गाढून त्याला टोक काढले जाते. त्या टोकावर वक्राकार लाकडाला मधोमध कोरुन ठेवले जाते. दोन्ही बाजूला मुलांना बसवून गोलगोल फिरवले जाते. घानमाकडीच्या खोल खाचेत कोळशाचे तुकडे फसविले जातात. धनुष्याच्या आकाराच्या लाकडावर संतुलन साधत गोलगोल फिरवले जाते. या घानमाकडीच्या खेळात लहान मुले दंग होतात. आज दुर्गम खेड्यामध्ये घानमाकड दिसत असले तरी शहरीकरणामुळे अनेक खेड्यातून ही घानमाकड आता नामशेष झाली आहे.
होळीच्या सणापूर्वी लहान मुले शेणापासून चाकोल्या तयार करीत होते. चाकोल्या वाळू घालून त्याची हार बनवून होळीत टाकल्या जात होती. तसेच पळस फुलांपासून परंपरागत रंगही तयार केला जात होता. परंतु आता हा सर्व प्रकार मागे पडला आहे. असं असलं तरी काही हौशी लोकं घानमाकडाच्या खेळाची जपणूक करतात. पळसाला लाल फूलं लागली असतात. या फुलांपासून रंग तयार केला जातो. या फुलांची माळही घानमाकडीला लावली जाते. होळी हा रंगांचा सण. निसर्गही मोठ्या प्रमाणात रंगांची उधळण करतो. निसर्गात फिरल्यास हे चित्र दिसते. जे दिसते ते समाजात अस्तित्वात असते. घानमाकड हे एक प्रतीक आहे. आपल्यालाही जीवनात असंच फिरावं लागते. त्यात आपण कसा आनंद घेतो, हे आपल्यावर अवलंबून आहे.