भरधाव दुचाकीस्वाराच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू; मृतदेह घेऊन संतप्त ग्रामस्थ पोहचले पोलीस ठाण्यात; मोबदला देण्याची मागणी
अपघाताला कारणीभूत ठरलेल्या आणि फरार झालेल्या शुभमला तत्काळ अटक करून मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी यावेळी संतप्त ग्रामस्थांनी केली. यावेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह थेट वरठी पोलीस ठाण्यातच ठेवला. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाल्यावर अतिरिक्त कुमक मागविण्यात आली.
भंडाराः भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत एका व्यक्ती जागीच ठार (Death) झाली. दुचाकीच्या धडकेत व्यक्ती मृत झाल्याचे लक्षात येताच अपघाताला कारणीभूत ठरलेल्या दुचाकीस्वाराला अटक करण्याची मागणी करुन मृत व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती त्यांना आर्थिक मोबदला द्यावा म्हणून संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या वरठी पोलीस ठाण्यात ठेवला. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घरामध्ये साहित्य आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला दुचाकीने धडक देऊन जीव गमवावा लागल्याने संतप्त ग्रामस्थांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाल्याशिवाय आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे पांढराबोडीतील (Pandharbodi) वातावरण प्रचंड तणावाचे बनले होते.
मोहाडी तालुक्यात अपघात
मोहाडी तालुक्यातील वरठी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पांढराबोडी येथे रात्री अपघात झाला होता. त्यामध्ये शुभम सुनील वाघमारे ( वय 21) याने आपल्या ताब्यातील दुचाकी (क्रमांक एमएच 40 बीबी 6597) ही भरधाव व निष्काळजीपणाने चालवून विजय गडिराम चकोले (41) यांना जोरदार धडक दिली होती. यामध्ये विजय चकोले हे गंभीर जखमी होऊन त्यांचा त्यामध्ये मृत्यू झाला.
दुकानातून परतताना उडवले
रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर विजय चकोले हे दुकानात गेले होते. तेथून ते घराकडे परतत असताना शुभमने भरधाव वेगाने दुचाकी चालवत त्यांना समोरून धडक दिली. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला होता. या घटनेची माहिती ग्रामस्थांना समजताच याची तक्रार पोलिसात देण्यात आली.
फरार दुचाकीस्वारास अटकेची मागणी
अपघाताला कारणीभूत ठरलेल्या आणि फरार झालेल्या शुभमला तत्काळ अटक करून मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी यावेळी संतप्त ग्रामस्थांनी केली. यावेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह थेट वरठी पोलीस ठाण्यातच ठेवला. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाल्यावर अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी संतप्त ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर तासभरानंतर ग्रामस्थांनी मृतदेहावर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पोलिस तपास करत आहे.