भंडारा : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाकडून दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर त्यानंतर लोकसभा अध्यक्षानी राहुल गांधी यांची खासदारकीही रद्द करण्यात आली. या दोन्ही प्रकरणामुळे काँग्रेस आता आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांच्यावरील कारवाई मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत काँग्रेसकडून आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी दिला आहे. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी राहुल गांधी यांच्यावरील कारवाईविषयी बोलताना सांगितले की, देशात अनेक प्रश्न आहे.
महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनत आहे. या प्रश्नांवर काँग्रेसकडून आणि मित्र पक्षाकडून वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
जनतेच्या प्रश्नांना काँग्रेसकडून वाचा फोडली जात असल्यामुळेच राहुल गांधी यांच्यावर कारवाई केली गेली आहे.
आमच्यासाठी महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत त्यामुळे भाजपकडून जरी कारवाईचा इशारा देण्यात आला असला तरी आम्ही त्याच्यावर आवाज उठवत राहू असा इशाार नाना पटोले यांनी दिला आहे.
देशात अनेक प्रश्न गंभीर बनत असताना नको त्या विषयाकडे भाजप लक्ष वेधून घेत आहे. देशात बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनत असताना राहुल गांधी यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आली आहे. कारण लोकांचे लक्ष वळवण्यासाठीच असे प्रकार केले जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर कारवाई केली गेली असली तरी त्याविरोधात आम्ही आवाज उठवत राहु. त्याचबरोबर जनतेचे प्रश्न घेऊनच काँग्रेस लढणार आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांच्यावर ज्या पद्धतीने खोटे आरोप लावून लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. तसेच दोन वर्ष जेलचे शिक्षाही सुनावण्यात आली आहे. त्यामुळेच आमची हुकूमशाविरुद्ध ही लढाई सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.