भंडारा : कारागृहातून कोर्टात पेशीला गेलेल्या कैद्या (Prisoner)जवळ गांजा (Ganja) आढळल्याची धक्कादायक घटना भंडारा कारागृहात उघडकीस आली आहे. कोर्टातून कारागृहात परत आल्यावर झडती दरम्यान प्रवेशद्वारातील अंमलदाराला कैद्याकडे 19.82 ग्रॅम गांजा आढळला. गांजा जप्त (Seized) करत आरोपी कैद्याविरोधात भंडारा शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कैदी क्रमांक 146 श्याम उर्फ पी टी रमेश चाचेरे असे गुन्हा नोंद झालेल्या कैद्याचे नाव आहे. या कैद्याला न्यायालयात भेटी दरम्यान हा गांजा देण्यात आला.
आज आरोपीची गोंदिया न्यायालयात पेशी होती. पेशी करुन गोंदिया न्यायालयातून परत भंडारा कारागृहात आल्यावर त्याची कारागृहातील मुख्य प्रवेशद्वारावर अंमलदार पोलिस चंद्रशेखर चामलाटे यांनी तपासणी केली. या तपासणीदरम्यान आरोपी कैद्याकडे 19.82 ग्रॅम गांजा आढळून आला. लागलीच गांजा जप्त करून आरोपी कैद्याविरुद्ध भंडारा शहर पोलिसात कलम 8 (क), 20 (ब), 2(अ) एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आली आहे. न्यायालयात भेटी दरम्यान आरोपीला गांजा देण्यात आला असून या अनुषंगाने भंडारा पोलिस तपास करीत आहेत.
आरोपी श्याम उर्फ पी टी रमेश चाचेरे हा गोंदिया शहरात दरोडा, धमकी देणे, तरुणांचा घोळका करुन दहशत माजवणे, अवैध धंदे करणे या संदर्भात गोंदिया पोलिसांनी अनेकदा अटक केली होती. सध्या आरोपी कारागृहात शिक्षा भोगत आहे. अनेकदा पोलीस कोठडीतसुध्दा संबंधित आरोपीने भोगली या संदर्भात गोंदिया पोलिसांनी मोक्का अंतर्गत त्याच्यावर कारवाई सुरू होती.