कृषी सहाय्यक नव्हे कृषी मारक, कृषी अधिकाऱ्याच्या धमकीने शेतकरी हादरले
आम्ही या कृषी सहाय्यकाला काही विचारलं तर समाधानकारक उत्तर देत नाही. भेटायला यायचं आहे म्हणून फोन केला तर टोलवाटोलवीची उत्तर देतो. मी दोन तासांत येतो. उद्या भेटतो, असं सांगून शेतकऱ्यांच्या कामात खोळंबा आणतो.
भंडारा : साकोली तालुक्या अंतर्गत एकोडी येथे श्री. डोंगरवार नावाचे कृषी सहाय्यक आहे. हा कृषी सहाय्यक कामानिमित्त आलेल्या शेतकऱ्यांना नेहमी टोलवाटोलवीची उत्तरं देत असतो. त्यामुळे आतेगाव येथील शेतकरी या कृषी सहाय्यकावर प्रचंड नाराज आहेत. गावात भातखचऱ्याची कामं सलग दोन वर्षांपासून दोन-तीनच शेतकऱ्यांच्या बांधावर करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. आम्ही या कृषी सहाय्यकाला काही विचारलं तर समाधानकारक उत्तर देत नाही. भेटायला यायचं आहे म्हणून फोन केला तर टोलवाटोलवीची उत्तर देतो. मी दोन तासांत येतो. उद्या भेटतो, असं सांगून शेतकऱ्यांच्या कामात खोळंबा आणतो. एस कुमार (नाव बदललेलं) शेतकऱ्याने चार-पाच वेळी फोन केल्यानंतर शेवटी भेटीसाठी वेळ दिली. पीएम किसान अर्जाच्या कागदपत्रांवर कृषी सहाय्यकाचा सही, शिक्का पाहिजे होता.
तत्पूर्वी संबंधित शेतकऱ्याने पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी या चारही जणांचे सही शिक्के फार्मवर घेतले होते. तेच कागदपत्र या कृषी सहाय्यकाला दाखवले. त्यानंतर त्याने थेट सात-बारा ओरीजनल असल्याशिवाय सह्या करणार नसल्याची धमकी दिली. संबंधित शेतकऱ्याने आधीच्या चार अधिकाऱ्यांनी सह्या चुकीने केल्या आहेत का, असा प्रतिप्रश्न केला. शिवाय सातबाराची सत्यता तुम्ही तपासून पाहू शकता. डिजिटल सातबारा कुठं ओरीजनल असतो. पीएम मोदी यांनी झेराक्सवर सह्या केल्यानंतर त्या ओरीजनल मानल्या जातात, असं सांगितलं होते. तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे का, असे प्रश्न विचारल्यानंतर खूप कष्टाने डोंगरवार याने सह्या केल्या.
शेतकऱ्याला शिविगाळ, कोण सहकार्य करतो ते पाहू अशी धमकी
कृषी सहाय्यकाच्या या सर्व प्रकरणाची तक्रार संबंधित शेतकऱ्याने साकोली तालुका कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार केली. त्यामुळे माझी तक्रार का केली, म्हणून डोंगरवारने थेट शेतकऱ्याला धारेवर धरले. डोंगरवार फोनवर संबंधित शेतकऱ्याला म्हणाला, मी कोणतं सहकार्य केलं नाही. का …. (शिवी) माणसं आहात तुम्ही. काही आहे दिमाक थोडोसा. पुढच्या वर्षी तुम्हाला कोण फळबाग योजनेचा लाभ देतो ते मी बघतो ना. बघतो मीही बघतो. कोण तुम्हाला सहकार्य करतो ते पाहू. काहीही दिमाखाच्या.. तुम्हाला कागदपत्रांवर सह्या न देता वापस पाठवलं असतं तर बरं झालं असतं. मी कागदपत्रांवर सह्या करून चुकी केली. तुमच्यासारख्याला फिरवायला पाहिजे बघतो मी.
या संवादाच्या क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर शेतकरी पेटून उठले. या तुम्हाला शासकीय योजनेचा लाभ कसा मिळतो ते मी बघून घेईन. असं हा कृषी सहाय्यक डोंगरवार म्हणत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या कृषी सहाय्यकाची चौकशी करून त्याला बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी एकोडी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
तरीही शेतकऱ्याला दिली अशी धमकी
विशेष म्हणजे संबंधित शेतकरी तीन दिवसांपूर्वी उपविभागीय कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांना भेटला. किशोर पात्रीकर यांनी डोंगरवार याला फोन करून संबंधित शेतकऱ्याच्या बाबतीत काही होत असेल तर बघा. मी उपजिल्हाधिकाऱ्यांशी बोलून फळबाग लागवडीसाठी प्रयत्न करतो. या शेतकऱ्याला दोन एकर सलग फळबाग लागवड करायची आहे. ही शासनासाठी चांगली गोष्ट आहे, असे समजावून सांगितले.
तरीही डोंगरवार याने संबंधित शेतकऱ्याला तुम्ही पुढच्या वर्षी फळबाग लागवड कशी करता ते बघतो, अशी थेट धमकी दिली. त्यामुळे एकोडी परिसरातील शेतकरी हादरले आहेत. जो कृषी सहाय्यक आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करत नाही, तो शेतकऱ्यांचे प्रश्न कसे मार्गी लावणार असा प्रश्न उपस्थित होतो. यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी स्वप्नील झंझाळ यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
प्रकरणाच्या चौकशीनंतर कार्यवाही करू
यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी स्वप्नील झंझाळ यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले या प्रकरणाची चौकशी केली जाईल. कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल.