भंडारा : भंडारा जिल्ह्यात संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द (Holiday Cancellation) करण्यात आल्या आहेत. भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी उद्या गुरुवारची 11 ऑगस्टची रक्षाबंधनाची (Rakshabandhan) सुटी रद्द केली आहे. सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना आपल्या आस्थापनात (मुख्यालयी) हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे उद्या, गुरुवारी 11 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा (शासकीय -खाजगी) सर्व शिकवणी वर्ग, अंगणवाडी केंद्र (Anganwadi Centre) यांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे. या आदेशाचे उलंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
भंडारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पूरपरिस्थिती आहे. त्यामुळं प्रशासकीय गरज पडल्यास कर्मचारी कार्यालयात असणे आवश्यक आहे. शाळांना आज आणि उद्या सुटी आहे. उद्या रक्षबंधनाची शासकीय सुटी आहे. परंतु, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात राहणे आवश्यक आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनानं दिला आहे. त्यामुळं काही कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. परंतु, आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी कळविलं आहे.
सततच्या पावसाने भंडारा जिल्हात पावसाने पाणी साचले. अनेक गाव मार्ग बंद आहेत. जिल्ह्यातील तब्बल 18 गाव मार्ग बंद आहेत. यामध्ये भंडारा, साकोली, तुमसर, पवनी व मोहाडी तालुक्यातील गावांचा समावेश आहे. यात भंडारा तालुक्यातील कारधा ते करडी, पवनी तालुक्यातील पवनी ते जुनोना, निलज ते काकेपर, तुमसर तालुक्यातील सिलेगाव ते वाहनी, साकोली तालुक्यातील वडेगाव ते खांबा, साकोली ते विरसी व मोहाडी तालुक्यातील आंधळगाव ते पेट, विटगाव ते टांगा, डोंगरगाव ते कान्हळगाव, अकोला ते वडेगाव, चिचोली ते शिवनी, चिचोली ते नवेगाव, रोहना ते इंदूरका, महालगाव ते मोरगाव, चौंडेश्वरी लहान पूल, मोहाडी ते मांडेसर, टांगा ते विहीरगाव, उसर्रा ते टाकला असे एकूण 18 गावमार्ग बंद आहेत. या सर्व गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.