भंडारा : जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील बघेडा (Bagheda in Tumsar Taluka) तलाव ओवर फ्लो झाले. बघेडा गावात तलावाच्या पुराचे पाणी शिरले. त्यामुळं सुमारे 40 घरांचे प्रचंड नुकसान झाले. या गावातील तब्बल 190 लोकांना गर्रा बघेड्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत (Zilla Parishad School) स्थलांतरित केले. विशेष म्हणजे बघेड्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र पाण्याखाली आले. लोकांना आरोग्याची समस्या भेडसावत आहे. या शाळेत तात्पुरती राहण्याची व जेवनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. आता नुकसानीचा पंचनामा करीत नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात दोन दिवस रेड अलर्ट घोषित करण्यात आले आहे. दमदार पावसामुळं नदी नाले ओसंडून वाहत आहेत. वैनगंगा नदीची (Wainganga River) धोका पातळी 245.50 इतकी असली तरी आज 246.97 धोका पातळीच्या वर पाणी पातळी ओलांडली आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे (Gosikhurd Dam) 33 दरवाजे उघडण्यात आली आहेत.
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी येथे कालपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये पावसाचे पाणी शिरले. मोहाडी पोलीस स्टेशनला तलावचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मोहाडी पोलीस स्टेशनजवळील नाला ओवर फ्लो झाल्याने 2 फुटांवर पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरले. यावेळी पोलिसांची एकच तारांबळ उडाली. गुन्ह्याचे महत्वपूर्ण कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांची धावपळ उडाली होती.
भंडारा जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून अतिवृष्टी झाली. तसेच मध्य प्रदेशातील संजय सरोवरातून पाणी सोडण्यात आले. पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील जीवनदायिनी मानली जाणारी वैनगंगा नदी आपल्या धोकापातळीच्या दीड मीटरवर वाहत आहे. भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. 2020 मध्ये आलेली महापुराची स्थिती पुन्हा येऊ नये म्हणून गोसे प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. भंडारा आणि कारध्याला जोडणारा ब्रिटिशकालीन पूल वैनगंगा नदीच्या पाण्याखाली गेला. पुलावरून तीन फुटांवरून पाणी वाहत आहे. त्यामुळे छोट्या वाहनांची रहदारी या पुलावरून बंद करण्यात आली आहे. दुसरीकडे भंडारा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. वैनगंगा नदीचे बॅक वॉटर शहरात घुसले. गोसेचा विसर्ग 14 हजार क्युसेक्सने वाढविण्यात आला आहे. नदीकाठावरील गावांना धोकादायक इशारा देण्यात आला आहे.
पाण्याचा अंदाज न आल्याने रोवणी कामासाठी गेलेला ट्रॅक्टर नाल्यात बुडाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव येथे घडली. वेळीच क्रेन बोलविल्याने 3 तासाच्या अथक प्रयत्नाने क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टरला बाहेर काढण्यात आले. अरुण समरीत यांच्या हा ट्रॅक्टर आहे. शेतीच्या कामासाठी किरायाने जात असताना आंधळगाव जवळील नाल्यात अंदाज न आल्याने ट्रॅक्टर बुडाला. वेळीच ड्रायव्हर बाहेर निघाल्याने त्याचे प्राण वाचले. मात्र ट्रॅक्टर पूर्णपणे नाल्यात बुडाला होता. अखेर क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टरला बाहेर काढण्यात आहे.