भंडारा : रोजगार हमी योजनेच्या (Employment Guarantee Scheme) कामावर असलेल्या मजुरांवर रानडुकराने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना भंडारा तालुक्यातील कोका येथे घडली. तिघींही भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात (District General Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एका महिलेला उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. कोका येथील रेखा सीताराम खेताडे (वय 45), शारदा मोहन रहाटे (वय 47), मंदा नेवारे (वय 40 वर्ष) अशी जखमींची नावे आहेत. भंडारा तालुक्यातील कोका येथे महिनाभरापासून रोजगार हमी योजनेंतर्गत शिंगारी बोडी खोलीकरणाचे काम सुरू आहे. सकाळच्या सुमारास मजूर जंगलालगतच्या बोडीवर कामावर गेले होते. कामाला सुरुवात झाली होती. झुडपात लपून असलेल्या रानडुकराने मजुरांवर हल्ला (attacked the laborers) केला.
यात रेखा, शारदा व मेघा या गंभीर जखमी झाल्या. तिघींच्याही कंबरेला, पायाला व पोटाला जबर दुखापत झाली. घटनेची माहिती होताच ग्रामस्थांनी धाव घेत मजुरांच्या मदतीने दोघींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यानंतर भंडारा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेने मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
कोका हे गाव जंगलात आहे. त्यामुळं वन्यप्राण्यांची नेहमी भीती असते. घरी राहून काम भागत नाही. शेतीची कामे झाली की, लोकं रोहयोच्या कामावर जातात. त्यातून त्यांना रोजगार मिळतो. शिंगारी बोडीच्या कामावर या महिला गेल्या होत्या. हे ठिकाणही जंगलातच आहे. रानडुकराने डाव साधून हल्ला केला. महिलांना झुडपातून रानडुक्कर येईल, याची कल्पना नव्हती. त्यामुळं त्या बिनधास्त होत्या. पण, अचानक झालेल्या या हल्ल्यामुळं त्यांना चांगलीच जखम झाली. आता जखमींवर उपचार सुरू आहेत. पण, वनात जंगली प्राण्यानं हल्ला केल्यास जखमींना नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. यातून जखमींना नुकसान भरपाई देण्याची यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.