भंडारा जिल्ह्याच्या साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत शिरेगाव बांध येतो. शिरेगाव बांध येथील एका 28 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीला पळवून नेले ( girl kidnapped) होते. आरोप सिध्द झाल्याने अतिरिक्त व सत्र न्यायाधीश पी. बी. तिजारे यांनी आरोपीला दहा वर्षे कारावासाची शिक्षा (Imprisonment) सुनावली. प्रशांत खोब्रागडे (Prashant Khobragade) असं आरोपीचं नाव आहे.ही घटना 3 ऑगस्ट 2016 रोजी घडली. अल्पवयीन मुलगी घरी दिसली नाही. मुलगी कुठे गेली म्हणून नातेवाईकाकडे तसेच तिच्या मित्र-मैत्रिणींकडे विचारपूस करण्यात आली. मात्र मुलगी दिसून आली नाही. अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे लक्षात आले. साकोली पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यात आली. या तक्रारीवरुन प्रशांत खोब्रागडे याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास साकोली पोलिसांनी केला. आरोपी प्रशांत खोब्रागडे याला अटक करण्यात आली. तपासाअंती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय तथा विशेष न्यायालय भंडारा येथे आरोपी विरुध्द आरोपपत्र दाखल करण्यात आले. या गुन्ह्याची सुनावणी अतिरिक्त व सत्र न्यायाधीश पी. बी. तिजारे यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकला. साक्षीदार तपासले. आरोपी प्रशांत खोब्रागडे याच्याविरुध्द अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याचे आरोप सिध्द झाला. आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. अल्पवयीन मुलींना पळवून नेणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळं प्रशांतला आता पुढील दहा वर्षे कारागृहात काढावी लागणार आहेत. झालेल्या घटनेबद्दल पश्चाताप केल्याशिवाय त्याच्याकडं काही उरलं नाही.