Bhandara Prahar | वाळू तस्करीत राजकीय लोकांचे साटेलोटे? बच्चू कडूंच्या प्रहारचा कार्यकर्ता वाळू तस्कर; एसडीओ मारहाण प्रकरणी अटक
अक्षय तलमले याला अटक केली आहे. अक्षय हा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा पवनी तालुकाध्यक्ष आहे. त्यामुळे आता या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या पाचवर पोहोचली आहे.

भंडारा : जिल्ह्यात वाळू तस्करीत राजकीय लोकांचे साटेलोटे असल्याचं समोर आलंय. वाळू तस्करीवर आळा घालण्यासाठी गेलेल्या भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड (Ravindra Rathod) यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत यांच्यावर वाळू तस्करांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यातील फरार झालेले प्रहार संघटनेचे पवनी तालुकाध्यक्ष अक्षय तलमले (Pawani Taluka President Akshay Talamle) याला अटक करण्यात आली आहे. भंडारा उपविभागीय अधिकारी (Divisional Officer) हे मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्यावर हल्ला झाला होता. 27 एप्रिलच्या पहाटे पवनी तालुक्यात सुरू असलेल्या वाळू वाहतुकीच्या कारवाईसाठी ते गेले होते. तीन टिप्पर अडविल्यानंतर अचानक 20 ते 25 तस्करांनी लाठ्याकाठ्या आणि हातात फावडे घेतले. महसूल अधिकाऱ्यांना मारहाण केली.
प्रहारचा पवनी तालुकाध्यक्ष निघाला वाळूतस्कर
वाळू तस्करांनी घटनास्थळ गाठत राठोड यांना मारहाण केली. त्यांच्या बचावासाठी आलेले पवनीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत यांनाही मारहाण झाली. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी धर्मेंद्र नखाते, राजेश मेघरे, राहुल काटेखाये, प्रशांत मोहरकर या चौघांना अटक केली आहे. काल अक्षय तलमले याला अटक केली आहे. अक्षय हा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा पवनी तालुकाध्यक्ष आहे. त्यामुळे आता या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या पाचवर पोहोचली आहे. त्यामुळे वाळू तस्करीत राजकीय व्यक्तींची उपस्थिती खूप काही बोलून जात आहे.
आमदार भोंडेकर उद्या आंदोलन करणार?
रेतीच्या भरधाव वाहनामुळे जिल्ह्यात अनेक अपघात झाले. त्यात निष्पाप दुचाकी स्वारांचे बळी गेले. अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करायला गेलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्याच्या 3 घटना महिनाभरात घडल्यात. यावर कुठलीही कारवाई पोलीस प्रशासनाने केली नाही. याउलट छोटा एस.पी. म्हणून काम करणारा एस. पी. कार्यालयातील पोलीस कर्मचारी हप्ते वसुलीत दंग होता. पोलीस प्रशासनाच्या पर्यायाने जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या भ्रष्ट व गुन्हेगारांना पाठीशी घालण्याच्या भूमिकेमुळेच ही घटना घडली आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांना तात्काळ हटविण्यात यावे अन्यथा सोमवारला 2 मे रोजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून देण्यात आला आहे.



