मोठी बातमी! भंडारा जिल्ह्यातील 58 ग्रामपंचायत निवडणुकींचा कार्यक्रम तडकाफडकी स्थगित
राज्य निवडणूक आयोगाने भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुकीचा जाहीर केलेला कार्यक्रम स्थगित केलाय.
भंडारा : राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबरला राज्यातील एकूण 7 हजार 751 ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. या कार्यक्रमानुसार सर्व ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 20 डिसेंबरला निकाल समोर येईल असं सांगण्यात आलंय. पण या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची माहिती समोर आलीय. राज्य निवडणूक आयोगाने भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुकीचा जाहीर केलेला कार्यक्रम स्थगित केलाय.
भंडारा जिल्ह्यातील एकूण 363 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा झाली होती. यामध्ये मोहोडी तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींचा समावेश होता. पण मोहाडी तालुक्यातील निवडणूक सध्या स्थगित करण्यात आलीय.
मोहाडी तालुक्यातील गावागावांमध्ये निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु असताना अचानक निवडणूक आयोगाने स्थगिती आणल्यामुळे उमेदवारांचा हिरमोड झालाय. या 58 ग्रामपंचायतींचा कार्यक्रम कधी जाहीर होईल, याबाबत अजून स्पष्टपणे माहिती समोर आलेली नाहीय. पण निवडणुकी स्थगितीमागे नेमकं कारण त्याबाबत माहिती समोर आलीय.
मोहाडी तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंचपदाच्या आरक्षणात चूक झाल्याचं राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आलंय. येत्या 18 डिसेंबरपर्यंत ही चूक सुधारणं शक्य होणार नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने मोहाडी तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित केलाय.
दरम्यान, निवडणूक स्थगित झाल्याने उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले आहे. तर उमेदवारांनी प्रचारासाठी केलेला खर्चही वाया गेला आहे.
निवडणूक प्रकिया पुन्हा लवकर राबवून, या रद्द करण्यात आलेल्या 58 ग्रामपंचायत निवडणुका लवकर घ्यावा ही मागणी भावी उमेदवार करीत आहे.