तेजस मोहतुरे
भंडारा : गाव आणि त्यापलीकडे जाऊन तालुका, या व्यक्तिरिक्त जग आदिवासी पाड्यातील विद्यार्थी (Tribal Pada Students) बघत नाहीत. अशा आदिवासी पाड्यावरील आणि तांड्यावरील मुलांनी खऱ्या अर्थाने जग बघावे, यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम (Bhandara District Collector Sandeep Kadam) यांनी आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना नागपूर विमानतळाची सैर घडवून आणली. नागपूरच्या मिहान व विमानतळाचे (Nagpur Mihan and Airport) जिल्हाधिकाऱ्यांनी दर्शन घडविले. हे प्रकल्प बघून विद्यार्थीही भारावून गेले. शाळेच्या बाहेर प्रथमच पडून आयुष्यात काही तरी नवीन करायचे असा आत्मविश्वास या शैक्षणिक सहलीतून त्यांना मिळाला.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर, साकोली, मोहाडी, भंडारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शासकीय शाळांमध्ये शिकणारे हे विद्यार्थी आहेत. 95 आदिवासी पाड्यातील व तांड्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी नागपूरच्या मिहान परिसराला भेट दिली. या शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने पुस्तकाबाहेरचे जग पाहण्याची संधी त्यांना मिळाली. गाव आणि तालुका येवढेच या विद्यार्थ्यांचे आयुष्य असते. अशा विद्यार्थ्याना पहिल्यांदाच उपराजधानीतील मिहान पाहण्याची संधी जिल्हाधिकाऱ्यांनी मिळवून दिली. विद्यार्थ्याना या सहलीतून प्रेरणा मिळाली. नवीन संधी त्यांना उपलब्ध व्हावी हाच उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सांगितले. तर नक्कीच या सहलीचा फायदा होईल, असं शरद सोनकुसरे व रितिक सोनी यांनी स्पष्ट केले.
तर दुसरीकडं, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या अध्ययन व दर्शनासाठी एक चमू रवाना झाली. नागपुरातून भंडारा जिल्ह्यातील 25 युवकांची चमू रायगडाच्या दिशेने रवाना झाली. हा अभ्यास दौरा पुणे जिल्ह्यातील शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यापासून सुरू झाला. नंतर सिंहगड (पुरंदर), राजगड, प्रतापगड, रायगड, गंचरपाले, मुरद, जंजिरा, कोलाई, रेवदादावरून परत भंडाऱ्याला येईल. आठ दिवसांचा हा प्रवास आहे. शिवरायांच्या चरित्रावर आणि त्यांच्या गड किल्ल्यांवर हे युवक अभ्यास करणार आहेत. या चमूमधील अधिकांश विद्यार्थी हे शिवकालीन युद्ध कला आणि त्याचे प्रत्याक्षिकसुद्धा करतात. शिवराय त्यांच्या रक्तात भिनलेले आहे. अशा विद्यार्थ्यांना शिवरायांच्या कामाच, त्यांनी बनविलेल्या गड किल्ल्यांचा अभ्यास करता यावा यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती शिवाजी महाराज उत्सव समितीचे दीपक शिवणकर यांनी दिली.