भंडारा : जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पाऊणगाव (Paungaon) येथील कैलास चौधरी (Kailas Chaudhary ) यांनी 6 महिन्यांपूर्वी इलेक्ट्रिक स्कुटी खरेदी केली. त्याच इलेक्ट्रिक स्कुटीने ये-जा करत होते. मात्र आपल्या इलेक्ट्रिक स्कुटीने (Electric Scooty) वडसावरून आपल्या गावी परत येत होते. सोनी गावाजवळ अचानक त्यांच्या स्कुटीने पेट घेतला. आग लागली हे कळताच कैलास यांनी गाडी थांबून स्वतः बाजूला झाले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र इलेक्ट्रिक स्कुटी जळून पूर्ण खाक झाली आहे. इलेक्ट्रिक वाहने जळण्याच्या घटना पुढे येत आहेत. त्यामुळं आता इलेक्ट्रिक गाडी खरेदी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. त्यामुळं आगीच्या घटना वाढल्या आहेत. कुठे शार्ट सर्किटनं तर कुठे अचानक पेट घेऊन आग लागत आहे. कैलास चौधरी यांनी ही गाडी सहा महिन्यांपूर्वी खरेदी केली. तेव्हापासून ते याच गाडीनं वडसा येथे ये-जा करतात. पण, काल अचानक गाडीला आग लागली. ही आग पाहून ते घाबरले. त्यांनी गाडी बाजूला सोडून दिली. गाडीवरून ते खाली उतरले. पाहतात तर काय गाडीने चांगलाच पेट घेतला होता.
भंडाऱ्यातील लाखांदुरात चालत्या स्कुटीला लागलेली आग. pic.twitter.com/wuYlN3GOCC
— Govind Hatwar (@GovindHatwar) April 7, 2022
स्कुटीला आग लागताच ती पाहण्यासाठी पाहणाऱ्यांची गर्दी उसळली. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात ते यशस्वी झाले नाही. तोपर्यंत गाडी पूर्णपणे जळून गेली होती. यात सुमारे सत्तर हजार रुपयांचं कैलास यांचं नुकसान झालं. दैव बलवत्तर म्हणून ते बचावले.
विदर्भातील कालपासूनची ही पाचवी घटना आहे. काल अकोला, वाशिम, यवतमाळ येथे आगी लागल्या. आज सकाळी सात वाजता नागपुरात आरा मशीनला आग लागली. यात कोट्यवधी रुपयांचे लाकूड जळून खाक झाले. लकडगंज भागात ही आग लागल्यानं मोठं नुकसान झालं.