फटाके फोडताना सावधान!, भंडाऱ्यात जे घडले ते कुठे घडू नये
लग्नसमारंभात लग्न लागल्यानंतर फटाके फोडले जातात. अशावेळी वऱ्हाड्यांना याचा त्रास होऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा अनुचित घटना घडण्यास वेळ लागत नाही.
भंडारा : उत्साहाच्या भरात आपण फटाके फोडतो. पण, फटाके फोडताना आजूबाजूच्या लोकांचा विचार करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात तणसाच्या ढिगावर फटाके पडल्यास ढिग जळून खाक होतो. लग्नसमारंभात लग्न लागल्यानंतर फटाके फोडले जातात. अशावेळी वऱ्हाड्यांना याचा त्रास होऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा अनुचित घटना घडण्यास वेळ लागत नाही. लग्न समारंभात अनुचित घटना घडण्याचे प्रकार हल्ली वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी लग्नात नाचणाऱ्या एका तरुणाला डीजेच्या आवाजाने कायमचा बहिरेपणा आल्याची घटना ताजी आहे. आणखी एक प्रकार भंडारा जिल्ह्यात समोर आला आहे.
निष्काळजीपणा वऱ्हाडांना भोवला
तुमसर तालुक्यातील विहीरगावात लग्न होते. गोंदियावरून वऱ्हाड आलं. फटाक्यांची आतषबाजी तर होणारच. मंगलाष्टके संपताच वर पक्षांकडील काही अती उत्साही तरुणांनी मंडपाबाहेर फटाक्यांची आतषबाजी सुरू केली. मात्र त्यांचा हा आततायीपणा आणि निष्काळजीपणा इतर वऱ्हाड्यांना भोवला. फुटलेले फटाके अंगावर उडून त्यात तीन जण गंभीररित्या जखमी झाले.
तीन जण जखमी
तुमसर तालुक्यातील विहीरगाव येथील एका लग्न समारंभात हा धक्कादायक प्रकार घडला. मनोहर तुमसरे (वय ५०) रा. कुलपा, सुभाष खडोदे (वय ५०) रा. नागपूर , उमेश चाणोरे (वय ४५) सेलोटी, जि. गोंदिया अशी जखमी झालेल्यांचे नावे आहेत. यापैकी मनोहर तुमसरे यांच्यावर तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, उर्वरित दोघांवर स्वगावी उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
जखमींना रुग्णालयात दाखल केले
तुमसर तालुक्यातील विहीरगाव येथे राजकुमार जांगळे यांच्या मुलीचा विवाह गोंदिया जिल्ह्यातील फुलचुर येथील तरुणाशी २ मे रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. विवाह सोहळ्यात मंगलाष्टके संपताच वर पक्षाकडील तरुणांनी मंडपाबाहेर फटाक्यांची आतषबाजी केली.
सदर फटाके अचानकपणे मंडपाबाहेर उपस्थित असलेल्या वऱ्हाड्यांच्या अंगावर पडले. यात तीन जण गंभीररित्या जखमी झाले. येथील नागरिकांनी जखमींना उपचारार्थ तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.