लग्न समारंभ आटोपून घरी परतत होते वऱ्हाडी, वाटेतच… अन् रात्रीच्या अंधारात एकच किंकाळी उडाली !
भंडाऱ्यातील मोहोळ तालुक्यातील वऱ्हाड गोंदियात लग्नासाठी गेले होते. लग्न समारंभ आटोपून सर्व जण घरी परतत होते. पण रात्रीच्या अंधारात जे घडले त्याने एकच हाहाःकार उडाला.
भंडारा / तेजस मोहतुरे : लग्न लावून घरी परत येत असताना वऱ्हाडाच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना भंडाऱ्यात घडली. तुमसर – गोंदिया राज्य मार्गावरील नवेगाव शेजारी गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने रात्री 2 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. गाडी अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या बाजूला पलटली. या अपघातात दोन लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर सहा जण जखमी आहेत. गाडीचा चालक बचावला असून, एक जण किरकोळ जखमी झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जण भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव येथील रहिवासी असून, लग्नासाठी गोंदिया येथे गेले होते.
वाहनावरील ताबा सुटताच चालकाने गाडीतून उडी घेतली
लोधीटोला (घिवारी) गोंदिया येथील शामराव लिल्हारे यांच्या मुलीचे लग्न मंगळवारी रात्री होते. त्या लग्नाला कान्हळगाव येथील वऱ्हाडी गेले होते. लग्न लावून आणि जेवण करून वऱ्हाडी गावाला परत येत होते. तुमसर -गोंदिया राज्य मार्गावर असलेल्या नवेगावच्या शेजारी रात्रीच्या सुमारास चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यानंतर गाडी चालकाने गाडीतून उडी घेतली आणि गाडी रस्ता ओलांडून चार -पाच कोलांट्या घेत शेतात स्थिरावली. अपघातात गाडीचा चेंदामेंदा झाला.
गाडीत चालकासह एकूण दहा वऱ्हाडी बसले होते. अपघात घडताच एकच कोलाहल सुरू झाला. आरडा ओरड सुरू झाली. त्याच गाडीत बसलेला नवरदेवाचा भाऊ सूर्यप्रकाश कस्तूरे याला किरकोळ मार लागला होता. सूर्यप्रकाश गाडीतून कसातरी बाहेर निघाला. त्याने गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढले.
दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू
विश्वनाथ बिहारी कस्तूरे आणि देवचंद सुखराम दमाहे खमारी हे दोघे जबर जखमी झाले. तर अमरदीप जयसिंग कस्तूरे, पंकज अरुण बर्वेकर, पट्टू रामा लिल्हारे, माणिक नागपुरे बेरडीपार यांना बाहेर काढण्यात आले. मागून त्याच लग्नाची दुसरी गाडी आली. त्या गाडीने सर्वांना तुमसर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी खमारी येथील देवचंद सुखराम दमाहे याचा वाटेतच मृत्यू झाला. तर पुढील उपचारासाठी रात्री शासकीय रुग्णालय भंडारा येथे नेत असताना विश्वनाथ बिहारी कस्तूरे कान्हळगाव यांचा मृत्यू झाला.
जखमी पैकी मयूर पांडुरंग गोमासे आणि सूर्यप्रकाश कस्तूरे यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना लगेच डिसचार्ज करण्यात आले. उर्वरित चार जखमी भंडारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. कान्हळगावात एका दिवशी आनंद सोहळा तर दुसऱ्या दिवशी शोककळा पहायला मिळाली. या घटनेमुळे पूर्ण गाव शोकग्रस्त आहे.