50 खोकेवाले नाही आम्ही 200 खोकेवाले, नरेंद्र भोंडेकर असं का म्हणाले?
तिकिटाच्या वेळेत उद्धव ठाकरे यांचा फोन स्वीच ऑफ होता. त्यामुळं अपक्ष उभं राहावं लागलं.
भंडारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडारा जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी बोलताना भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले, लोकं म्हणतात खोकेवाले आमदार. भंडाऱ्यात असं काही नाही. 50 खोक्यांचा आरोप आमदारांवर लावला जातो. पण, आम्ही 200 खोकेवाले आमदार आहोत, असं आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांसमोर सभेत ते बोलत होते. 200 कोटी रुपयांच्या विकासकामाचे लोकार्पण व भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यामुळं आम्ही 200 खोकेवाले आमदार आहोत, असं सांगायला ते विसरले नाही.
विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडाऱ्यात आले. नरेंद्र भोंडेकर म्हणाले, 2009 आणि 2019 मध्ये आमदार झालो. पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा गावसुद्धा माहीत नव्हते.
आम्ही आंदोलन न्याय मिळण्यासाठी करत होतो. आता काही लोकं स्टंटबाजीसाठी आंदोलन करतात. 2019 मध्ये जिल्हा प्रमुख असूनही मला तिकीट मिळालं नाही. संघटनेत होतो. पण, तिकिटाच्या वेळेत उद्धव ठाकरे यांचा फोन स्वीच ऑफ होता. त्यामुळं अपक्ष उभं राहावं लागलं.
सगळे आमदार, मंत्री शिंदे यांच्यासोबत आहेत. कारण ते आजी-माजी सगळ्यांच्या सोबत असतात. म्हणून माजी आमदार अनिल बावनकर यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. मदत करणं हा शिंदे साहेबांचा स्वभाव आहे.
लाखांदुरात जाऊन बघा. शिक्षण, आरोग्य, रोजगाराचा बोऱ्या वाजविला. अतिमागासवर्गीय तालुका आहे. या मतदारसंघातून नाना पटोले हे निवडून येतात. इतके वर्षे निवडून येऊनही तुमचा तालुका अतिमागास कसा, असा सवाल नरेंद्र भोंडेकर यांनी केला.