तिनं एयर इंडियाच्या नोकरीवर सोडलं पाणी, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत झाली सहभागी
अतिषाच्या दृष्टीने दोन्हीही बाबी महत्वाच्या असतांना नोकरी नंतर करता येईल, यात्रा नंतर करता येणार नाही, असे म्हणत तीने नोकरीवर पाणी सोडलं आणि भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
नाशिक : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या एका तरुणीची जोरदार चर्चा होत आहे. या तरुणीचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात शेयर करत तिचे कौतुक होतांना दिसून येत आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडओ यात्रेत तरुणाई मोठ्या प्रमाणात सहभागी होतांना दिसून येत असून त्यात नाशिकची एक तरुणी सहभागी झाली आहे. नाशिकरोड परिसरात राहणारी अतिषा पैठणकर असे या तरुणीचे नाव असून तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचे कारण म्हणजे, अतिषा गेल्या काही वर्षांपासून नोकरीसाठी प्रयत्न करत होती. तीन वर्षानंतर तिला एयर इंडियाचे ऑफर लेटर आले होते. एयर इंडियाकडून जॉइन होण्यासाठी अतिषाला 7 सप्टेंबर ही तारीख देण्यात आली होती. आणि याच दिवशी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात होणार होती. अतिषा समोर भारत जोडो यात्रा की एयर इंडियामध्ये नोकरी असे दोन पर्याय मनात काहूर करत होते.
अतिषाच्या दृष्टीने दोन्हीही बाबी महत्वाच्या असतांना नोकरी नंतर करता येईल, यात्रा नंतर करता येणार नाही, असे म्हणत तीने नोकरीवर पाणी सोडलं आणि भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
नाशिकच्या नाशिकरोड येथे राहणारी अतिषा पैठणकर हिने भारत जोडो यात्रेत कन्याकुमारीपासून सहभाग घेतला असून महाराष्ट्रात येईपर्यन्त अतिषा भारत जोडो यात्रेत चालत आहे.
अतिषा हिने नोकरी सोडून भारत जोडो यात्रेत सहभाग घेतल्याने तिच्या कुटुंबानेच तिला सुरुवातीला विरोध केला होता, कुटुंबाचा रोष पत्कारून अतिषाने भारत जोडो यात्रेचा प्रवास सुरू केला आहे.
भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याने एयर इंडियाच्या नोकरीच्या ठिकाणी अतिषा जॉइन होऊ शकली नाही त्यामुळे एयर इंडियाकडून वेळेत हजर न झाल्यास तुमची संधी जाणार असल्याचा ईमेलही अतिषाला मिळाला आहे.
एकूणच अतिषाने नोकरीवर पाणी सोडून भारत जोडो यात्रेत सहभाग घेऊन राहुल गांधींच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला असून बोलून काहीही होणार नसून कृती करायची म्हणून हा निर्णय घेतल्याचे अतिषाचे म्हणणे आहे.
कन्याकुमारीपासून अतिषा ही भारत जोडो यात्रेत सहभागी झाली असून अतिषाच्या पायाला फोड सुद्धा आले होते, यात्रेत अनेकांच्या समस्या आणि युवा वर्गाशी संवाद साधता आल्याने ही शिदोरी आयुष्यभरासाठी महत्वाची ठरणार असल्याचे अतिषा सांगतेय.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातून जाणार असून त्यामध्ये नांदेड, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्यातून जाणार असून अंतिम टप्प्यात ही यात्रा आली आहे.