सोलापूर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेला सशर्त परवानगी मिळाली असली तरी राज यांची सभा उधळून लावणार असल्याचा इशारा भीम आर्मीने (bhim army) दिला आहे. भीम आर्मी आपल्या म्हणण्यावर अजूनही ठाम आहे. त्यामुळे मनसैनिक (mns) आणि भीम आर्मीचे कार्यकर्ते आमनेसामने उभे ठाकण्याची चिन्हे दिसत आहेत. हा वाद सुरू असतानाच भीम आर्मीने आणखी एक इशारा दिला आहे. राज ठाकरे यांनी पोलिसांनी घालून दिलेल्या 16 अटींचं उल्लंघन केल्यास त्यांच्या सभेत महापुरुषांच्या नावाने घोषणा देण्यात येईल, असा इशारा भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. या शिवाय राज यांच्या सभेला विरोध करण्यासाठी भीम आर्मीचे कार्यकर्ते औरंगाबादला रवाना होणार आहेत. मात्र, भीम आर्मीच्या किती कार्यकर्त्यांचा जत्था औरंगाबादला रवाना होणार याची माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, भीम आर्मीचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाल्याने राज यांच्या सभेला अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेत जरूर भाषण करावं. पण त्यांनी काही आक्षेपार्ह विधान केल्यास भर सभेत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या नावाने जोरदार घोषणा देणार असल्याचा इशारा भीम आर्मीचे राष्ट्रीय सचिव अशोक कांबळे यांनी दिला आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज यांच्या सभेवर बंदी घालण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांनी ही याचिका दाखल केली आहे. वकील अजय कानवडे यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली आहे.
येत्या 48 तासांवर रमजान ईद आली आहे. दोन समुहात तेढ निर्माण होईल असं भाषण होण्याची शक्यता आहे. ऐतिहासिक औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेला आमचा विरोध नाही. पण त्यांनी दोन समाजात तेढ निर्माण करणारं विधान करू नये. त्यांच्या भाषणाने महाराष्ट्र पेटू शकतो. त्यामुळे त्यांच्या सभेला बंदी घालण्यात यावी, अशी मागणी जयकिशन कांबळे यांनी केली आहे.