परदेशात वापरलेले मास्क धुवून विक्रीचा घाट, भिवंडीत एकावर गुन्हा दाखल
या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून रविवारी रात्री उशिरा भंगारातील मास्क नष्ट करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.
भिवंडी : परदेशातून आलेल्या भंगारातील मास्क धुवून (Bhiwandi Mask Reuse Issue) वापरात आणण्याचा प्रकार ‘टीव्ही 9 मराठी’ने उघड केला होता. त्यानंतर या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून रविवारी रात्री उशिरा भंगारातील मास्क नष्ट करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून या कारवाई आदेश देण्यात आले.
वळ ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक अमोल कदम (Bhiwandi Mask Reuse Issue) यांच्या तक्रारीनंतर रविवारी रात्री दहा वाजता कलम 269 नुसार इम्रान शेखविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सध्या जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले असताना भारतात त्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर मास्कची मागणी वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर परदेशातून भंगार येत असून त्यामध्ये वापरलेले मास्कसुध्दा मोठ्या प्रमाणावर आहेत.
सध्या बाजारात मास्कचा तुटवडा असल्याने परदेशातून भंगारात आणलेले वापरलेले मास्क येथील गोदामात धुवून पुन्हा विक्रीसाठी आणण्याचा घाट गोदाम मालकाचा होता. मात्र, असं करत असतानाचा एक व्हिडीओ शनिवारी रात्री (7 मार्च) व्हायरल झाला. हा व्हिडीओ ‘टीव्ही 9 मराठी’ने दाखवला. त्यानंतर पोलीस आणि आरोग्य विभाग यंत्रणा खडबडून जागी झाली.
या व्हायरल व्हिडीओचा तपास करत असताना स्थानिक नागरिकांनी हे गोदाम हे वळ ग्रामपंचायत हद्दीतील पारसनाथ कंपाऊंड मधील इमारतीत असल्याचे सांगितले. सकाळी त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी स्थानिक पंचायत समिती सदस्य विकास भोईर ग्रामस्थांसह बि – 108 या गोदामात गेले. मात्र, तेथील कामगार हे मास्क पुर्णा ग्रामपंचायत हद्दीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन शेजारील कचरा टाकण्याच्या जागेत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचं निदर्शनास आलं होतं.
पाईपलाईन शेजारी वापरलेल्या मास्कचा माल फेकून दिल्याची माहिती पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय, स्थानिक नारपोली पोलीस ठाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कळविल्यावर सर्व यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. घटनास्थळी धाव घेत त्यांनी परिस्थितीची पाहणी केली.
मास्क नष्ट करण्याचे आदेश
या मुद्देमलावर कारवाई करायची कोणी? याबाबत बरीच खलबते झाल्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी याबाबत घटनास्थळाचा पंचनामा करुन नारपोली पोलिसांकडे तक्रार दिली. तसेच, हे मास्क नष्ट करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश दिले.
“ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा अद्याप शिरकाव झाला नसला, तरी खबरदारी म्हणून आरोग्य विभाग तत्परतेने दक्ष आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता मास्क विकत घेताना ते नवे असल्याची खात्री करावी, नव्हेच तर हातरुमाल सुध्दा मास्कचे काम करू शकते”, असा सल्ला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे .
जगभर करोना व्हायरस ने थैमान घातले आहे. भारतात सुध्दा त्याचा शिरकाव होऊन आतापर्यंत 39 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग दक्षता घेत आहेत. तसेच, नागरिकही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. या वापरलेल्या मास्कच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रयत्न काळाबाजार करणारे करत आहेत. त्यावर आता आरोग्य विभाग आणि पोलीस यंत्रणा नक्की कोणती (Bhiwandi Mask Reuse Issue) कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
कोरोनाची धास्ती! वाशिममध्ये साखरपुड्यातच लग्न उरकले
कोरोनाबद्दल अजित पवारांची जागरुकता, प्रत्येक कार्यक्रमात हस्तांदोलन टाळत नमस्कार
कोरोनाचा चिकन बाजाराला फटका, 60 टक्के मांसाहारप्रेमींची चिकनकडे पाठ
Coronavirus : कोरोनाची भीती, हाताऐवजी पायाने ‘हँडशेक’, व्हिडीओ व्हायरल