मराठा आंदोलनाच्या फटक्यामुळे जालना लोकसभा मतदार संघात माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा धक्कादायक पराभव झाला होता. आता जालना लोकसभेत समावेश असलेल्या भोकरदन विधानसभा मतदार संघातून भाजपाचे नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पूत्र संतोष दानवे निवडणूक लढविणार आहेत. त्यांची मुख्य लढत राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे चंद्रकांत दानवे यांच्याशी होणार आहे. लोकसभेतील जरांगे फॅक्टर यंदाही विधानसभेत लागू होणार का ? या विषयी चर्चा सुरु आहे.
मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठवाडा ढवळून निघाला आहे. या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाचा मोठा फटका मराठवाड्यात लोकसभेच्या वेळी भाजपाला बसला होता. त्यामुळे जालनातून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला होता. आता विधानसभेला भाजपाकडून जालना लोकसभा मतदार संघातील भोकरदन येथून रावसाहेब दानवे यांचे पूत्र संतोष दानवे यांनाच पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. संतोष दानवे साल 2014 पासून सगल दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांची यंदा हॅटट्रीक होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील या मतदार संघात कोणाला उभे करतात की कोणाला पाडायचे आवाहन करतात यावर सर्व अवलंबून आहे.
भोकरदन विधानसभा निकाल – 2019 ( Bhokardan Vidhan sabha 2019)
पक्ष ( विधानसभा - 2019 निकाल ) | उमेदवाराचे नाव | मतदान | टक्केवारी |
---|---|---|---|
भाजप | संतोष दानवे | 1,18,539 | 54.65% |
राष्ट्रवादी काँग्रेस | चंद्रकांत दानवे | 86,049 | 39.67% |
वंचित बहुजन आघाडी | दीपक बोराडे | 8,298 | 3.83 % |
या मतदार संघातून राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र साल 2014 पासून या मतदार संघावर भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांचा वरचष्मा राहीलेला आहे. साल 2014 पासून संतोष दानवे सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. सध्या भोकरदन मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी मतदार संघात अनेक विकास कामे केलेली आहेत. त्यामुळे मतदार त्यांना यंदा पसंती देतात का हे निवडणूकीत स्पष्ट होणार आहे.
भोकरदन विधानसभा निकाल – 2014 ( Bhokardan Vidhan sabha 2014 )
पक्ष | उमेदवाराचे नाव | मतदान | टक्केवारी |
---|---|---|---|
भाजप | संतोष दानवे | 69, 597 | 35.09 % |
राष्ट्रवादी काँग्रेस | चंद्रकांत दानवे | 62,847 | 31.69 % |
शिवसेना | रमेश गव्हाड | 36, 298 | 18.30 % |
या मतदार संघात ओबीसी आणि मराठा मतदार संघ जवळ सारख्याच संख्येने आहेत. त्याखालोखाल मुस्लीम आणि दलित मतदारांची लोकसंख्या आहे. त्यामुळे मराठा आणि ओबीसी मतदारांसोबत ओबीसी आणि दलित मतदारांती साथ कोणाला मिळते यावर या मतदार संघातील जय-पराजय अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांत भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात काही प्रमाणात रस्त्यांचे बांधकाम झाले आहे. मात्र अनेक गावे, वाड्या आणि वस्त्यांना रस्त्यांनी जोडलेले नाही. सिंचनाच्या सुविधा या ठिकाणी काही प्रमाणात झालेल्या आहेत. परंतू अनेक बंधाऱ्यांना गळती लागलेली आहे. रोजगार हमी योजनेतून विहीरी मंजूर न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
भोकरदन विधानसभा निकाल – 2009 ( Bhokardan Vidhan sabha 2009 )
पक्ष | उमेदवाराचे नाव | मतदान | टक्केवारी |
---|---|---|---|
राष्ट्रवादी कॉंग्रेस | चंद्रकांत दानवे | 67,480 | 29.38 % |
भारतीय जनता पार्टी | रावसाहेब दानवे | 65,841 | 28.67 % |
अपक्ष | सर्जेराव विठोबा शिंदे | 11,163 | 4.86 % |
भोकरदन विधानसभेत नेहमी दानवे विरुद्ध दानवे लढत पाहायला मिळत असते. यंदाही प्रमुख लढत भाजपाचे संतोष रावसाहेब दानवे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यात पाहायला मिळणार आहे. परंतू यंदा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी देखील दावा केलेला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटातून मनिष श्रीवास्तव, रमेश गव्हाड आणि कैलास पाटील पुंगळे देखील निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.
जाफराबाद तालुक्याने महायुतीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांना लोकसभेत लीड दिली होती. त्यामुळे शिवसेनेला संधी मिळावी. दानवे यांच्या मुलाचे राजकीय वजन नाही. वडीलांच्या भरोशावर काम चालू होते. रावसाहेब दानवे यांचाच पराभव झाल्याने त्यांची दहशत कमी झाली आहे. त्यामुळे संतोष दानवे आता निवडून येणार नाहीत. ही सीट शिवसेनेला मिळावी अशी मागणी शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख रमेश गव्हाड यांनी केली आहे.
जालना लोकसभेत पराभूत झालेले माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे याला जालनातील भोकरदन येथून विधानसभेसाठी उमेदवारी मिळालेली असताना आता त्यांची मुलगी संजना जाधव हीला कन्नड मतदार संघातून शिवसेनेच्या तिकीटावर उमेदवारी देण्याचा निर्णय महायुतीमध्ये घेण्यात आलेला आहे.
भोकरदन विधानसभा मतदार संघ – 103 हा साल 2008 झालेल्या मतदार संघ फेररचनेनुसार तयार झालेला मतदार संघ आहे.भोकरदन मतदार संघात जालना लोकसभा मतदार संघातील सहा मतदार संघापैकी एक आहे. भोकरदनमध्ये जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुका, भोकरदन तालुक्यातील धावडा, पिंपळगाव ( रेणूकाई ), सिपोराबाजार, भोकरदन ही महसूल मंडळे आणि भोकरदन नगरपालिका क्षेत्राचा समावेश आहे.