WITT 2025 : औरंगजेबाची कबर हटवली पाहिजे का? केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव स्पष्टच बोलले
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी टीव्ही९च्या 'व्हाट इंडिया थिंक टुडे' कार्यक्रमात अलीकडच्या ओरंगजेब आणि राणा सांगा वादावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी इतिहासातील सत्य समोर यावे, असं त्यांनी म्हटलंय. तसेच समाजवादी पक्षाच्या वादग्रस्त विधानाचा निषेध केला. बिहार मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या आरोग्याबाबतच्या प्रश्नांवरही त्यांनी भाष्य केले.

टीवी9 नेटवर्कच्या वार्षिक कार्यक्रम ‘व्हाट इंडिया थिंक टुडे’ च्या दुसऱ्या दिवशी ‘सत्ता सम्मेलन’ मध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी अलीकडच्या काळात ओरंगजेब आणि राणा सांगा यांच्याशी संबंधित वादावर भाष्य केलं. इतिहासाची खरी बाजू समोर यायला हवी, असं ते म्हणाले. तसेच, बिहारमधील मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या आरोग्याबाबतच्या प्रश्नांवरही त्यांनी भाष्य केलं. आरजेडीला काहीही म्हणू द्या. त्यांच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही, असा दावा भूपेंद्र यादवा यांनी केला. तसेच औरंगजेबाची कबर हटवली पाहिजे का? या प्रश्नावरही त्यांनी थेट भाष्य केलंय.
राणा सांगा यांच्याबद्दल समाजवादी पार्टीच्या एका खासदाराने दिलेल्या वादग्रस्त विधानावर भूपेंद्र यादव यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते विधानच अत्यंत चुकीचं आहे. राणा सांगा एक अत्यंत शूरवीर होते. त्यांनी 100 पेक्षा अधिक लढायांमध्ये भाग घेतला. त्यांच्या शौर्यापुढे सर्वचजण नतमस्तक होतात, असं भूपेंद्र यादव यांनी सांगितलं.
विधान निषेधार्ह
मला वाटतं समाजवादी पार्टीचे नेते विधानं करत आहे, आणि काँग्रेस मौन साधून आहेत. आता काँग्रेसवालेही त्या पद्धतीने बोलत आहेत. त्यांची मानसिकता ठिक नसल्याचं हे लक्षण आहे. इतिहासाचे जेवढे विषय आहेत आणि त्याबाबतचा त्यांचा अभ्यास नाहीये तर त्यांनी बोलू नये. आम्ही आमच्या देशातील नागरिकांचा सन्मान करतो. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन पुढे जातो. त्यांचं ते विधान निषेधार्ह आहे, असं यादव म्हणाले.
इतिहासाची खरी बाजू समोर यावी
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 300 वर्षांनंतरही चालू असलेल्या वादावर भूपेंद्र यादव यांनी भाष्य केलं. लोकांच्या मनात अनेक गोष्टींची सल असते. आम्ही नवनिर्मिती करू इच्छितो. त्यामुळेच नवीन निर्मिती करण्यासाठी आम्ही जुन्या गोष्टींपासून धडा घेतला पाहिजे. एक व्यापक दृष्टीकोण असला पाहिजे. दीर्घकाळापासून लिहिलेल्या इतिहासाबाबत लोकांनी संवेदनशील असलं पाहिजे. ज्यांना वादाशी संबंधित माहिती आहे, अधिकारवाणीने बोलण्याची ज्यांची योग्यता आहे, त्यांनीच त्यावर बोललं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यावर नियंत्रण करणं कठिण आहे. पण मला वाटतं इतिहासाचं सत्य समोर आलं पाहिजे. इतिहासाच्या सत्याच्या आधारेच सर्वांशी संबंध संतुलित ठेवले पाहिजे. पण इतिहासाचं जे वास्तव आहे, त्याकडे दुर्लक्षही करता कामा नये, असंही ते म्हणाले.
औरंगजेबाची कबर हटवली पाहिजे का? असा सवाल भूपेंद्र यादव यांना करण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, मी काही त्यातील तज्ज्ञ नाही. जे लोक प्रतिक्रिया देत आहेत. त्यांनाच तुम्ही विचारलं पाहिजे. मी यावर अधिक भाष्य करू शकत नाही.
बिहार निवडणुकीवर भाष्य
यावेळी त्यांनी बिहार निवडणुकीवरही भाष्य केलं. भाजप आणि एनडीए बिहारला विकासाच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रपक्षांशी मिळून येत्या निवडणुकीत आम्ही चांगली कामगिरी करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं. नितीश कुमार यांच्या आजारपणावरही त्यांनी भाष्य केलं. आरजेडीला जे बोलायचं ते बोलू द्या. आरजेडीच्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही. नितीश कुमार हे सन्मानिय नेते आहेत. आम्ही त्यांचा पूर्णपणे आदर करतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.