ओबीसी महासंघाची मोठी मागणी, पहिल्यांदा प्रमाणपत्र घेणाऱ्यांची SIT चौकशी करा…
सरकार हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पूर्ण एक दिवस मराठा आरक्षणाविषयी चर्चा करणार आहे. त्याचप्रमाणे एक दिवस ओबीसी समाजासाठी एक दिवसाची चर्चा विधानसभेत घडवून आणावी अशी आमची मागणी आहे.
गजानन उमाटे, नागपूर | 21 नोव्हेंबर 2023 : सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या. जी आश्वासने दिली त्याची अजून पूर्तता झालेली नाही. सरकार हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पूर्ण एक दिवस मराठा आरक्षणाविषयी चर्चा करणार आहे. त्याचप्रमाणे एक दिवस ओबीसी समाजासाठी एक दिवसाची चर्चा विधानसभेत घडवून आणावी अशी आमची मागणी आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतले. जे पहिल्यांदा प्रमाणपत्र घेत आहेत. त्यांना शोधून काढा. त्याची सत्यता पडताळून पहावी यासाठी SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणीही राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केलीय.
मराठा ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी tv9 शी बोलताना तायवाडे यांनी ओबीसी समाजाला दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता हिवाळी अधिवेशनाच्या आधी करावी अशी मागणी केली. ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी काल पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी जे सुचवले की राज्य सरकारने सबकॅटेगरी कराव्या. त्यांच्या या मागणीला आमचा विरोध आहे, असे तायवाडे म्हणाले.
मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळू शकते हे त्यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे आहे. जी जात अजूनही मागास समाजात आलेली नाही त्याची कॅटेगरी कशी होणार? असा सवाल त्यांनी केला. याबाबत हरिभाऊ राठोड आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत डिबेट करायला तयार आहे. कारण हा टेक्निकल मुद्दा आहे. त्यामुळे कुणीही संभ्रम निर्माण करू नये असेही ते म्हणाले.
छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार हे दोन्ही नेते समाजासाठी झटत आहेत. आम्ही या दोन्ही नेत्यांसोबत आहोत. एखाद दुसऱ्या वक्तव्यावरून त्यांच्यात मतभेद असू शकतात. पण, वडेट्टीवार आणि भुजबळ यांच्यात मनभेद नाहीत. जे नेते आमच्या संघर्षासाठी पुढे येतील त्यांच्यासोबत आम्ही काम करू. भुजबळ यांनी स्पष्ट केल आहे की ओबीसीमधून आरक्षण द्यायचे नाही. माझ्यावर दोन महिने टीका झाल्या. माझे मत वैयक्तित आहे असेही त्यांनी म्हटले आहे, याकडे तायवाडे यांनी लक्ष वेधले.
आम्हाला दोन समाजात द्वेष निर्माण करायचा नाही. पण, सर्व ओबीसी नेते एकत्र असणे महत्वाचे आहे. आम्हाला आमच्या आरक्षणाचे संविधानीक रक्षण करायचे आहे. त्यामुळे सगळे सोबत आहे. कुणबी समाजाच्या ज्या नवीन नोंदी शोधून काढल्या जात आहे. यातील जे पहिल्यांदा प्रमाणपत्र घेत आहेत. त्यांना शोधून काढा. त्याची SIT मार्फत चौकशी करावी. सत्यता पडताळून घ्यावी, अशी मागणीही तायवाडे यांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांची ठाणे आणि नाशिकला सभा होत आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा. त्यांनी त्यांच्या समाजाविषयी जनजागृती करावी. त्याला आमचा विरोध नाही. ते त्यांच्या मागणीसाठी संघर्ष करत आहे. तर, आम्ही आमच्या समाजाच्या संविधानिक संरक्षणासाठी प्रयत्न करत आहोत, असेही तायवाडे यांनी स्पष्ट केले.