गणेश सोलंकी, बुलढाणा | 18 जानेवारी 2024 : स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन, कापूस दरवाढीसाठी रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना रात्री ताब्यात घेतले. तुपकर यांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीला कार्यकर्त्यांनी अडवून जाब विचारला. तुपकर यांनी कार्यकर्त्यांना समजवल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या गाडीला जाऊ दिले. मात्र, जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यानी रास्ता रोको तर काही ठिकाणी टायर जाळून अटकेचा निषेध केला. मेहकर येथे तुपकर यांना अटक केल्याचे निषेधार्थ रस्ता रोको करण्यात आला आहे. मेहकर चिखली हायवेवर रास्ता रोको करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.
सोयाबीन, कापूस प्रश्नी झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी स्वभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी १९ जानेवारीला मलकापूर रेल्वे स्थानकावरून मुंबई, दिल्लीसह गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या अडविण्याचा इशारा दिला होता. हे आंदोलन होण्यापूर्वी बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना नोटीस बजावली होती. त्यामुळे तुपकर काल रात्रीपासून भूमिगत होते. पोलिसांनी त्यांच्या घराभोवतीसुद्धा कडक बंदोबस्त ठेवला होता. त्यांना शोधण्यासाठी पोलिस कामाला लागले होते.
रविकांत तुपकर हे गाडी बदलून मलकापूरकडे जात असतांना राजुर घाटात पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना बुलढाणा वरून मेहकरला नेण्यात आले. याची कार्यकर्त्यांना कुणकुण लागताच त्यांनी तुपकर यांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीला कार्यकर्त्यांनी चिखली आणि लव्हाळा येथे अडविले. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांना जाब विचारला.
रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातली. त्यानंतर त्यांना बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. दरम्यान, तुपकर यांच्यावर कलम १५१ अंतर्गत गुन्हा दाखल करून उद्या न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. मात्र, उद्या रेल्वे रोको आंदोलन होणारच अशी भूमिका तुपकर यांनी घेतली आहे.
स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलनाच्या आधी पोलीस ताब्यात घेतात असा आमचा अनुभव आहे. त्यामुळे तुपकर यांनी भूमिगत होऊन, पोलिसांना गुंगारा देऊन आंदोलन यशस्वी करायला हवे होते. अटक करून शेतकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही. उद्या संग्रामपूरमधील मोर्चा झाल्यानंतर या संदर्भातील माहिती घेतो अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली.