मोठी बातमी | सगेसोयरे जीआर आजच निघणार? सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेअंती मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने नवीन अध्यादेश काढण्यात आला. हा नवीन अध्यादेश घेऊन राज्य सरकारचे शिष्टमंडळ वाशी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले.
नवी मुंबई | 26 जानेवारी 2024 : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या वाशी येथील सभेत बोलताना सरकारल आवाहन केलं होते. आमची मेन मागणी आरक्षणाची आहे. सरकारचा जीआर रात्रभर वाचून काढणार आहे. त्यावर चर्चा करणार आहे. याबाबत काही चर्चा करायची असेल तर माझ्याकडे या. माझ्याशी चर्चा करा. मी परस्पर निर्णय घेतल्याचा ठपका ठेवू नका असे मनोज जरांगे पाटील म्हणाले होते. तर, इकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, या बैठकीत झालेला निर्णय घेऊन सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा वाशी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बैठक झाली. सुमारे चार तास ही बैठक सुरु होती. प्रधान सचिव भूषण गगराणी, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे, मुख्यमंत्री यांचे ओएसडी मंगेश चिवटे या बैठकीला उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेअंती मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने नवीन अध्यादेश काढण्यात आला. हा नवीन अध्यादेश घेऊन राज्य सरकारचे शिष्टमंडळ वाशी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले.
राज्य सरकारच्या या शिष्टमंडळात सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, औरंगाबादचे विभागीय आयुक्त मधुकर आरंगळ, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे स्वीय सचिव डॉ. अमोल शिंदे आणि सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी वाशी येथे सरकारने जे निर्णय घेतले त्याचे पत्रक काढा. डेटाही द्या. सग्यासोयऱ्यांचा अध्यादेश काढा. उद्या दुपारी ११ ते १२ वाजेपर्यंत आम्हाला अध्यादेश द्या. नाही तर आझाद मैदानात येणार आहोत. आम्ही इथून उठणार नाही. मोफत शिक्षण आणि नोकरीत राखीव जागा ठेवण्याचा निर्णय पाहिजे. १५ मिनिटात अध्यादेश दिला तर आझाद मैदानात जाणारच, पण गुलाल उधळायला असे स्पष्ट केले होते. मात्र, सरकारचे शिष्टमंडळ आता त्यांच्या भेटीला गेले आहे. त्यामुळे मनोज ज्रांगे पाटील यांच्या मागण्या मान्य होणार का याकडे मराठा आंदोलकांचे लक्ष लागले आहे.