BREAKING : शीतल म्हात्रे प्रकरणाचा तपास एसआयटीकडे, चार जण अटकेत, मंत्री शंभूराज देसाई यांची विधानसभेत माहिती
अशोक वन जंक्शन येथे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयासमोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. बाईक रॅलीमध्ये शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या संवाद संभाषणाचे चित्रीकरणाच्या वस्तुस्थितीमध्ये अशोभनीय बदल करून तो सोशल माध्यमावर अपलोड करण्यात आला.
मुंबई : आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या तथाकथित व्हिडिओ घटनेसंदर्भात अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज संपेपर्यत सभागृहात निवेदन देणायचे आदेश सरकारला दिले होते. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत निवेदन सादर केले. शितल म्हात्रे यांच्या व्हिडिओत अशोभनीय बदल करून तो सोशल माध्यमातून अपलोड केला. या प्रकरणी चार आरोपीना अटक करण्यात आली आहे. यातली एक आरोप ठाकरे गटाशी संबंधित आहे, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. तसेच, या संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपविण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी केली.
11 मार्च 2023 रोजी मिठी नदीच्या पुलाच्या नूतनीकरण उद्घाटनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास भाजपचे खासदार गोपाल शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर, आमदारप्रकाश सुर्वे तसेच शिवसेनेचे उपनेते शीतल म्हात्रे आणि कार्यकत्रत उपस्थित होते.
अशोक वन जंक्शन येथे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयासमोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात बाईक रॅलीमध्ये शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या संवाद संभाषणाचे चित्रीकरणाच्या वस्तुस्थितीमध्ये शीतल म्हात्रे यांच्या व्हिडिओत अशोभनीय बदल करून तो सोशल माध्यमावर अपलोड करण्यात आला.
याबाबत शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस स्टेशन येथे पहाटे तीन वाजता गुन्हा दाखल केला. त्या अनुषंगाने दहिसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक मराठे तपास करत आहेत. यामध्ये अशोक राजदेव मिश्रा ( 45 ), अनंत कुवर ( 30 ), विनायक भगवान डावरे ( 26 ) आणि रवींद्र बबन चौधरी ( 34 ) असा चार आरोपीना अटक केली आहे.
माननीय न्यायालयाने या आरोपींना 15 मार्च 2023 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सोशल मीडिया अकाउंटद्वारे घृणास्पद व अश्लील व्हिडिओ व्हायरल करून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्याद्वारे संबंधिताची बदनामी केल्याचे दिसून येते. यामध्ये चार मोबाईल हँडसेट व पाच मायक्रो सिम कार्ड जप्त केली असून अधिक चौकशी सुरू आहे.
तपासादरम्यान यातील आरोपींनी संबंधित व्हिडिओची एडिटिंग व मॉर्फिंग केल्याचे दिसून येते. तसेच, यातली आरोपी विनायक भगवान डावरे हा ठाकरे गटाशी संबधीत असून त्याने मातोश्री या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ जाणीवपूर्वक काही व्हाट्सअप ग्रुप वर व्हायरल केला. सदरचे कृत्य गंभीर असून याबाबत तपासासाठी सहा पोलिस अधिकारी यांची टीम तपास करत आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासात मुळापर्यंत जाऊन याचा मुख्य सूत्रधार शोधणे व सदरचा प्रकार कोणाच्याही बाबतीत होऊ नये यासाठी सीनियर आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करून त्यांच्या मार्फत या गुन्ह्याचा पुढील तपास केला जाईल, अशी घोषणा शंभूराज देसाई यांनी केली.