भाजपला मोठं खिंडार, विद्यमान खासदार उन्मेष पाटील अखेर ठाकरे गटात; ‘मातोश्री’च्या अंगणात प्रचंड जल्लोष
जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी अखेर भाजपला मोठा धक्का दिला आहे. आपल्या शेकडो समर्थकांसह उन्मेष पाटील यांनी अखेर ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. पाटील यांच्या प्रवेशामुळे जळगावमध्ये ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. तसेच जळगावमध्ये आता चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. उन्मेष पाटील यांनी मातोश्री निवासस्थानी ठाकरे गटात प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून उन्मेष पाटील यांनी मशाल हाती घेतली. यावेळी पाटील यांच्या शेकडो समर्थकांनीही ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी मातोश्री परिसरात एकच जल्लोष करण्यात आला. उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने जळगावमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. तसेच सत्ताधारी भाजपच्या विद्यमान खासदाराने महाराष्ट्रात पक्षांतर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार असलेल्या उन्मेष पाटील यांचं तिकीट कापलं. उन्मेष पाटील यांच्या ऐवजी स्मिता वाघ यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे उन्मेष पाटील प्रचंड नाराज झाले होते. या नाराजीतूनच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. मध्यंतरी त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली अन् आज अखेर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांचे शेकडो समर्थक उपस्थित होते. त्यांच्या समर्थकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजीही केली. उन्मेष पाटील यांच्या प्रवेशामुळे जळगावात ठाकरे गट अधिक मजबूत होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
जळगावातून लढणार
दरम्यान, उन्मेष पाटील हे आता ठाकरे गटाकडून जळगावातून लढणार असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबतची घोषणाही केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. उन्मेष पाटील हे जळगावातून विजयी झाल्यास शिवसेनेचा जळगावमधील हा पहिला विजय असेल. जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे ठाकरे गट भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पदासाठी नाही, स्वाभिमानाची लढाई
ही पदाची, जय-विजयाची लढाई नाही तर ही स्वाभिमानाची, आत्मसन्मानाची लढाई आहे. खानदेशाच्या विकासाच्या बाजूने पुढे नेणार लढाई आहे, अशी प्रतिक्रिया उन्मेष पाटील यांनी दिली. मला उमेदवारी मिळालेली नाही म्हणून ही भूमिका घेतलेली नाही . पण राजकारणात काम करताना मान सन्मान नको , पद नको, पण त्याचा स्वाभिमान सांभाळला जात नसेल अवहेलन केली जात असेल तर लाचार होऊन राजकारण करणं योग्य नाही.
उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झाला का असं विचारलं जातं. राजकारणात आमदार खासदार होणं हे साध्य नव्हतं. काम करत असताना शासकीय योजनांचा पॅटर्न आता सुरू आहे तो आपण जळगावात सुरू केला होता. कोणतीही चिरीमिरी न देता केला. लोकांना पैसे देऊन आणलं नाही. पॉलिसी मेकरची किंमत नाही. काम करणाऱ्यांची कदर नाही. मला न विचारता दुसऱ्यांना लोकसभेची उमेदवारी दिली गेली. देशातील पहिल्यांदा निवडून आलेल्या २९२ खासदारांमध्ये चांगलं काम करणाऱ्यात माझं नाव होतं.
मी प्रामाणिकपणे काम केलं. जनता आणि संसदेतील दुवा म्हणून काम केलं. मला बदला घेण्यासाठी पद दिलं नाही, तर मी बदल करण्यासाठी काम केलं होतं. बदल्याचं राजकारण त्रास देणारं होतं. त्याचा राग येत होता. वेदना होत होत्या. बदल करण्याऐवजी बदल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये रुजवली जात आहे. त्या पापाचे वाटेकरी होऊ नये म्हणून वेगळा होण्याचा विचार केला. बैठकीला न बोलावणं आणि अपमान करणं हे प्रकार सुरू होते. म्हणून स्वाभिमान गहाण न ठेवण्याचा निर्णय घेतला. तुम्ही स्वाभिमानाची लढाई सुरू केली. त्यात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही उत्तर महाराष्ट्रात शिवसेना रुजवू. पदासाठी नाही, खासदार होण्यासाठी नाही तर कार्यकर्ता म्हणून काम करण्यासाठी आलो आहे, असेही पाटील म्हणाले.
आधी राजीनामा, मग प्रवेश
दरम्यान, ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. उन्मेष पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे राजीनामा पत्र दिलं आहे. मेलच्या माध्यमातून उन्मेष पाटील यांनी त्यांचा लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नावाने पत्र लिहून उन्मेष पाटील यांनी राजीनामा दिला. मी माझ्या जळगाव लोकसभा सदस्यत्वाचा तत्काळ राजीनामा देत असून तो स्वीकार करावा, असे त्यामध्ये नमूद करण्यात आले. राजीनामा दिल्यानंतरच उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात आज प्रवेश केला.