नाशिक : रात्री उशिरा नाशिकमधील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित बाळसाहेबांची शिवसेना अर्थातच शिंदे गटात प्रवेश केला आहे. गेल्या आठवड्यापासून नाशिक राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. यामध्ये सर्वात मोठा धक्का हा शिवसेना ठाकरे गटाला बसत आहे. नाशिकमधील राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी होत असून शिंदे गटात इनकमिंग तर ठाकरे गटातून आउटगोइंग मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. यामध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी शिंदे गटात दाखल होत असतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि इतर संघटनांचे पदाधिकारी देखील शिंदे गटात प्रवेश करीत असल्याने शिंदे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. मंगळवारी रात्री उशिरा शिंदे गटात नाशिकमधून पन्नासहून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे अधिवेशन सुरू असतांनाही प्रवेशाची मालिका सुरू असल्याचे दिसून येत आहे.
मागील आठवड्यात नाशिकमधील ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख, 13 माजी नगरसेवक यांचा प्रवेश झाला होता, त्यामुळे ठाकरे गटाला मोठे खिंडार पडल्याचे चित्र होते.
13 माजी नगरसेवकांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या धक्क्यातून ठाकरे गट सावरत नाही तोच आता शिंदे गटात माजी आमदार आणि विविध पक्षांचे पन्नासहून अधिक प्रवेश झाले आहे.
दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांचा यामध्ये प्रवेश झाला आहे, दिंडोरी येथील जिल्हाप्रमुख यांच्यासह तालुकाप्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित प्रवेश केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचे पुतणे मंगेश करंजकर यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हरीश भडांगे, माजी नगरसेविका मेघा नितीन साळवे, ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका मंदाकिनी जाधव यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे.
शिक्षण मंडळाचे सदस्य बाबूराव आढाव, छत्रपती सेनेचे अध्यक्ष गणेश कदम, विक्रम कदम यांच्याबरोबरच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
नाशिकच्या राजकारणात शिंदे गटाच्या इनकमिंगनंतर जोरदार चर्चा सुरू असून ठाकरे गटाला या प्रवेशामुळे मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.