बारामतीतून पवार कुटुंबाविरुद्ध दंड थोपटणाऱ्या अभिजीत बिचुकलेंची संपत्ती किती? आकडा ऐकाल तर…
अभिजीत बिचुकलेंनी काही दिवसांपासून बारामती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात अभिजीत बिचुकलेंच्या संपत्तीची माहिती नमूद करण्यात आली आहे.
Abhijit Bichukale Property : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. सध्या महाराष्ट्रात अनेक हायव्होलटेज लढती पाहायला मिळत आहे. यातील एक हायव्होलटेज लढत बारामती मतदारसंघात होणार आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात काटे की टक्कर होणार आहे. विशेष म्हणजेच या मतदारसंघातून बिग बॉस मराठीतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता अभिजीत बिचुकले यानेही अर्ज दाखल केला आहे. आता त्याच्या संपत्तीबद्दलची माहिती समोर आली आहे.
‘बिग बॉस’च्या घरात आपल्या श्रीमंतीचा तोरा मिरवणाऱ्या अभिजीत बिचुकलेंची संपत्ती कोट्यवधींच्या घरात असेल, असा अंदाज अनेक लोकांनी लावला होता. मात्र अभिजीत बिचुकलेंनी निवडणूक शपथपत्रात जाहीर केल्यानुसार त्यांची संपत्ती केवळ काही हजारांच्या घरात असल्याचं समोर आलं आहे. अभिजीत बिचुकलेंनी काही दिवसांपासून बारामती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात अभिजीत बिचुकलेंच्या संपत्तीची माहिती नमूद करण्यात आली आहे.
अभिजीत बिचुकलेंची संपत्ती किती?
या शपथपत्रानुसार, अभिजीत बिचुकले यांच्या संपत्तीत २०१९ च्या तुलनेत घट झाली आहे. २०१९ मध्ये अभिजीत बिचुकले यांची संपत्ती ७८ हजार ५०३ रुपये इतकी होती. तर आता त्यांची संपत्ती ७२ हजार ५०० रुपये इतकी आहे. तसेच त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची स्थावर संपत्ती नाही. अभिजीत बिचुकले यांचे शिक्षण बी.ए. ऑनर्स पर्यंत झाले आहे. अभिजीत बिचुकलेंवर १ प्रलंबित गुन्ह्याची नोंददेखील आहे.
कोण आहे अभिजीत बिचुकले ?
अभिजीत बिचुकले हे साताऱ्यातील फेमस व्यक्तिमत्त्व आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यामुळे ते राज्यभर चर्चेत आले. अभिजीत बिचुकलेने बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून हजेरी लावली होती. अभिजीत बिचुकले स्वत:ला कवी म्हणवून घेतात. त्यांनी आतापर्यंत नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीपर्यंतच्या अनेक निवडणुका लढवल्या आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरुद्धही त्यांनी कित्येकदा निवडणूक लढवली होती. बिग बॉसच्या घरात वादग्रस्त वक्तव्य करणे, टास्क खेळताना नियमांच्या विरुद्ध वागणे, घरातील महिला सदस्यांसोबत फर्ल्ट करणे यामुळे ते चर्चेत आळे होते. बिग बॉसच्या घरात वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना अल्पावधीतच प्रसिद्ध मिळाली आहे. अभिजीत बिचुकलेंनी आदित्य ठाकरेंविरुद्ध वरळीतून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.