राष्ट्रवादीच्या खासदाराचे सर्वात मोठे विधान, ‘त्या’ दोन पक्षांचा प्रवेश त्रासदायक…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव खासदार सुनिल तटकरे यांनी बारामती शहर राष्ट्रवादी कार्यालयाला भेट दिली. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केले.
बारामती : देशात भाजप सरकार आल्यानंतर नव नवी धोरणे राबविली जात आहेत. 370 सारखे कलम हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला. आणखी काही अजूनही महत्त्वाचे निर्णय घेतले. पण, राष्ट्रवादी काँग्रेसची एकच भूमिका आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात जे लिहिले आहे त्याची अंमलबजावणी केली जावी. समान नागरी कायद्याबाबत पक्षाची अधिकृत भूमिका शरद पवार साहेब मांडतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घोटाळ्याची चौकशीबाबतचं विधान ऐकलं. पण, त्यांच्या भाषणाचा मतितार्थ हाच आहे की, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आणि त्यांच्या विरोधात विविध राजकीय पक्षांचे नेते एकवटले आहेत त्या संदर्भातली त्यांनी ती टिपणी केली असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पद कुणाकडे?
अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षाचा कणा आहेत. संबंध महाराष्ट्रात गेल्या पंचवीस वर्षात पक्ष उभारणीत त्यांचे मोठे योगदान आहे. पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात त्यांनी जी भावना व्यक्त केली त्याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. उद्याच्या राजकारणात पक्षाची आव्हानात्मक स्थितीत होणारी वाटचाल याबाबत त्यांची भावना त्यांनी स्पष्टपणे मांडली असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
नवी शक्ती नवे ध्रुवीकरण
2019 च्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार मोठ्या प्रमाणात पराभूत झाले. त्याचा परिणाम विधानसभेत मात्र झाला नाही. पण, नवी शक्ती नवे ध्रुवीकरण ज्यावेळी होईल त्याचा परिणाम धर्मनिरपेक्ष मतांच्या ध्रुवीकरणांमध्ये होऊ शकतो. याचा महाविकास आघाडी आणि घटक पक्ष विचार करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मतांचे विभाजन म्हणजे भाजपाला मदत
2019 च्या मतदानाची आकडेवारी काढली तर माझ्या मतदारसंघात बहुजन वंचित आघाडीला लक्षणीय मत मिळाली होती. ते उमेदवार उभे राहिले नसते तर माझे मताधिक्य लाखापेक्षा जास्त मतांनी वाढल असते. धर्मनिरपेक्ष विचारांच्या मतांमध्ये विभाजन होणे म्हणजे भाजपाला मदत करणे हे सरळ सूत्र आहे.
बीआरएस, वंचित बहुजन आघाडीचा प्रवेश त्रासदायक
राज्यात बीआरएस किंवा वंचित बहुजन आघाडी यांच्याकडे येणारी मते ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधातील मतदारांचा कौल असतो. या मतात फूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय जनता पार्टीला पडणारी मते ठरलेली असतात. धर्मनिरपेक्ष विचारांची मते ही ठरलेली असतात. त्यामुळे बीआरएस आणि वंचित बहुजन आघाडी या शक्तींचा महाराष्ट्रातल्या होत असलेला प्रवेश त्रासदायक आहे असे तटकरे म्हणाले.