कल्याणमध्ये बड्या नेत्यावर हल्ल्यानंतर भाजप आक्रमक, पोलिसांना दिला 12 तासांचा अल्टीमेटम
कल्याणमध्ये भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर आता शहरातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपकडून पोलिसांना आरोपींना पकडण्यासाठी 12 तासांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.
कल्याण पश्चिमेत भाजप नेते हेमंत परांजपे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर आता शहरातील भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले बघायला मिळत आहे. हेमंतर परांजपे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना 12 तासांत पकडा अन्यथा भाजप रसत्यावर उतरणार, असा इशाराच भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “दहशत पसरविण्याचा सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई केली जावी,” अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, या हल्ल्याचे नेमके कारण आणि सूत्रधार कोण? याबाबत पोलीस चौकशी सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेमंत परांजपे यांनी सांगितला घटनेचा थरार
हेमंत परांजपे यांनी आपल्यासोबत घडलेल्या घटनेचा थरार सांगितला आहे. “परवा रात्री लग्न समारंभामध्ये गेलो होतो. आमच्या ओळखीच्या माणसाने मला घराजवळ सोडलं. यानंतर अचानक दोघेजण आले. त्यांनी तोंडाला रुमाल बांधून माझ्यावर भ्याड हल्ला केला. अशाप्रकारे भ्याड हल्ला करणाऱ्याला मी नपुंसक बोलतो. चेहरा उघडा ठेवायची हिंमत त्यांनी दाखवायला पाहिजे होती. आरोपी अचानक आले आणि दोघांनी माझ्या उजव्या बगलेत मारायला सुरुवात केली. हल्ला दोघे तरुण मुलं होती. मी खाली पडलो तेव्हा त्यांनी सहा ते सात वेळा माझ्यावर सिमेंटचे ब्लॉक मारले. माझं दुर्दैव आणि नशीब ते सगळे पेवरब्लॉक मी माझ्या पायावर घेतले आणि एकच डोक्याला लागला म्हणून मी बचावलो. नाहीतर मी जिवंत नसतो”, असं हेमंत परांजपे म्हणाले.
“हे कोणी केलं हे माझ्याकडे पुराव्यासह येणार आहे. मात्र हे सगळं राजकारणामुळे झालेलं आहे. राजकीय चढाओढीतून हा हल्ला घडलाय. गेल्या 48 वर्षांपासून मी काम करतोय. मी वाईट प्रवृत्तीच्या विरोधात राहिलो. त्याचं फळ आणि त्याचे फायदे अशा प्रकारे मिळत आहेत”, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.
‘माझ्यावर अशा वेळेस हल्ला केला तर…’
“राजकीय हेतूने प्रेरित ही घटना झालेली आहे. आगामी काळात महापालिका निवडणुका आहेत. कल्याणमध्ये मी सीनियर असल्यामुळे भाजपचा उपाध्यक्ष आहे. यामुळे माझ्यावर अशा वेळेस हल्ला केला तर नवीन आलेले कार्यकर्ते दचकतात आणि वाईट प्रवृत्ती फोफावते. हेच कारण आहे. बाकी काही कारण नाही”, असा दावा हेमंत परांजपे यांनी केला. “मी कोणाचं एक रुपया देणे नाही किंवा शिवीगाळ वगैरे असा कुठलाच प्रकार केलेला नाही. माझं कोणाशी भांडण झालं नाही”, असंही परांजपे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
“हा प्रशासनात असलेला ढिसाळपणा आहे. गृहमंत्री आमचे देवा भाऊ असले तरी नऊ तारखेला आमची त्यांच्याबरोबर भेट झाली. लवकरच बरा झाल्यावर मी त्यांना भेटायला जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली आहे. त्यांनी पोलीस प्रशासनाला योग्य रीतीने तपास करण्याचे सांगितले देखील आहे. हाताची पाच बोटे सारखी नाही. सत्ता असली तरी 14 कोटी जनता आहे. मात्र तेवढे पोलीस नाहीत. त्यामुळे प्रशासन देवा भाऊ किंवा भाजपच्या लोकांना दोष देणार नाही. जनसंख्या पाहता प्रत्येक ठिकाणी पोलीस संरक्षण देऊ शकत नाहीत. माझ्यावर हल्ला झाला तरी मी भारतीय जनता पक्षाला दोष देणार नाही”, असं हेमंत परांजपे म्हणाले.
भाजपच्या अंतर्गत वादाने हल्ला झाल्याचा आरोप?
“मात्र पक्षांमध्ये असलेली ही धूसफूस हे या घटनेला कारणीभूत आहे हे 100 टक्के. आमच्या पक्षांतर्गत वादातून हा हल्ला झालाय का याचा संशय आहे. फक्त माझ्याच पक्षातला नाहीतर राजकीय हेतूने प्रेरित होउन झालेली घटना आहे”, असं म्हणज हेमंत परांजपे यांनी भाजपच्या अंतर्गत वादाने हल्ला झाल्याचा आरोप केला.
“माझा पोलीस प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे. पुढच्या 15 ते 20 दिवसात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी भेट होणार आहे. मला आता अनेक नेत्यांचे फोन येऊन गेलेले आहेत. मी त्यांना शांत राहण्यास सांगितले आहे. प्रशासनाच्या हातात तपास आहे. त्यात काय निष्पन्न होतात ते पाहूया. एक सीसीटीव्ही फुटेज मी दिलेला आहे. पोलिसांना अजून चार फुटेज मी देणार असे सांगितले आहे”, असं हेमंत परांजपे म्हणाले.
“मी प्रशासनाला मदत करतो आणि पोलीस निश्चितपणे याच्यात लक्ष घालून खरे आरोपी कोण आहेत आणि फक्त ज्यांनी हल्ला केला तोच नाही तर त्याचबरोबर याचा कर्ताधर्ता आणि ज्याने हा प्लॅन केला आहे तो समोर येईल. माझं स्पष्ट मत आहे की, या वेळेला माझ्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी नाही, तर ठार मारण्याचा प्लॅन होता”, असा मोठा दावा हेमंत परांजपे यांनी केला.