सावरकरांचा पुन्हा अपमान, काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या मुलाविरोधात भाजप आक्रमक, राज्यभरात प्रतिकात्मक अंत्ययात्रा
मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद चांगलाच पेटला आहे. कर्नाटक विधानसभेच्या दालनातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र काठून टाकण्यात यावे, असे अवमानजनक विधान प्रियांक खर्गे यांनी केले
नाशिक | 8 डिसेंबर 2023 : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद चांगलाच पेटला आहे. कर्नाटक विधानसभेच्या दालनातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र काढून टाकण्यात यावे, असे अवमानजनक विधान प्रियांक खर्गे यांनी केले होते. मात्र त्यांच्या या विधानानवरून आता रान पेटलं आहे. या वादग्रस्त वक्तव्यविरोधात भाजप नेते, कार्यकर्ते राज्यभरात रस्तावर उतरले आहेत. प्रियांक खर्गे यांच्याविरोधात संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी निदर्शने तसेच आंदोलने करण्यात येत आहेत. नाशिक, पुणे, छ. संभाजीगर, धुळे यासह राज्यात विविध ठिकाणी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून खर्गे यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
नाशिकमध्ये निषेध
प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरक यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करत नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाने खर्गे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी आंदोलकांनी खर्गे, राहुल गांधी यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही घोषणा दिल्या. शहरातील रेडक्रॉस सिग्नलवर भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले आणि ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा घेऊन ते जवळच असलेल्या काँग्रेसभवनजवळ जात होते. मात्र तेवढ्यात पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांकडून खर्गे यांचा प्रतिकात्मक पुतळा ताब्यात घेतला.
छ. संभाजीनगरमध्येही आंदोलन
खर्गे यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे लोण छ. संभाजीनगर येथेही पोहोचले. प्रियांक खर्गे यांनी सावरकर यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक येथे आंदोलन करण्यात आले. तेथे गाढवाच्या गळ्यात खर्गे, तसेच राहूल गांधी यांचा फोटो लावून आंदोलन करण्यात आले. तसेच त्यांच्याविरोधात जोरजोरात घोषणाही देण्यात आल्या.
त्याशिवाय पुण्यातही भाजप युवा मोर्चाच्या वतीने सारस बागेजवळील स्वातंत्रवीर सावरकर पुतळ्या जवळ आंदोलन करण्यात आले. तर धुळे येथे भाजप युवा मोर्चाच्या वतीने प्रियांक खर्गे यांचा पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला. धुळे महापालिकेच्या चौकात खर्गे यांच्या पुतळ्याला जोडे मारून त्याचे दहन करण्यात आले. यावेळी माजी आमदार, महापौर ,जिल्हाध्यक्ष, याच्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी खर्गे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.