अमित शाहांच्या वक्तव्यावरून भाजप, काँग्रेसमध्ये जुंपली, मुद्द्याची लढाई गुद्द्यावर, संसदेबाहेर राडा
अमित शाहांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आणि माफीची मागणी करत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंसह, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी आंदोलन केलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्याचा वाद, आता धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला आहे. संसद परिसरात इंडिया आघाडीचे खासदार आंदोलन करत होते. त्याच दरम्यान राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप भाजपच्या खासदारांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या वक्तव्याचा निषेध करताना संसदेच्या परिसरात अक्षरश: राडा झाला.
संसदेच्या प्रवेशद्वारावर भाजपचे खासदार प्रताप सारंगींना धक्का दिल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर करण्यात आला आहे. ज्यात प्रताप सारंगी खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. तर दुसरीकडे भाजपच्या खासदारांनीच गुंडागर्दी करुन मल्लिकार्जुन खर्गेंना पाडल्याचा आरोप काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी केला आहे.
अमित शाहांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आणि माफीची मागणी करत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंसह, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी आंदोलन केलं. काही खासदार संसदेच्या प्रवेशद्वारावर चढून आंदोलन करत होते, त्याच दरम्यान काँग्रेसचे खासदार आणि भाजपचे खासदार आमनेसामने आले. यामध्ये खाली पडून भाजप खासदार प्रताप सारंगी हे जखमी झाले. या राड्यात आणखी एक खासदार मुकेश राजपूत हे देखील जखमी झाले आहेत.
दरम्यान राहुल गांधींनी धक्का दिल्यामुळे पडल्याचा आरोप प्रताप सारंगी यांनी केला आहे. मात्र भाजप खासदारांचे आरोप खोटे असून , आम्हालाच संसदेत जाण्यापासून रोखलं असं राहुल गांधींचं म्हणंण आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेत्या प्रियकां गांधी यांनी देखील भाजपच्या खासदारांनीच गुंडागर्दी करुन मल्लिकार्जुन खर्गेंना पाडल्याचा आरोप केला आहे. इकडे महाराष्ट्राच्या विधीमंडळ परिसरातही, महाविकास आघाडीच्या आमदारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो हाती घेत. अमित शाहांच्या वक्तव्याचा निषेध केला.
आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला. डॉ. आंबेडकरांचा अपमान आपण केलेला नाही, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे. मात्र विरोधक माफीवरच अडून बसल्यानं, संसदेत जोरदार राडा झाला. प्रकरण थेट धक्काबुक्कीपर्यंत पोहोचलं. तर दुसरीकडे मुंबईत आज भाजपकडून काँग्रेसचं कार्यालय फोडण्यात आलं आहे.