ठाकरे गटाला राज्यात पब, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का?; चित्रा वाघ यांचा घणाघाती आरोप
ठाकरे गटाला राज्यात पब, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का, असा सवाल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले
लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यातील मतदान झाले असून देशभरात आणखी पाच टप्प्यात मतदान होणे बाकी आहे. सत्ताधारी असोत की विरोधक हे सर्वच निवडणुकीच्या पार्श्नभूमीवर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यातच आता एका जाहिरातीवरून वातावरण तापण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या एका जाहिरातीवर भाजपाने आक्षेप घेतला आहे. ठाकरे गट हा महाराष्ट्रामध्ये अतिशय किळसवाणं असं पब, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणायचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन, काही फोटो दाखवत त्यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ माजली आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ ?
शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे गटाने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये महिला अत्याचारासंबंधी प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यारून चित्रा वाघ यांनी निशाणा साधला. ‘ अदूबाळ नाईट लाईफ प्रायव्हेट लिमिटेड च्या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलेलं एक पात्र हा एक पॉर्न स्टार आहे. आणि तोच या जाहिरातीमध्ये विचारतो की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार ? आणि हाच इसम लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चित्रीकरण करतोय. या जाहिरातीत वडिलांच्या भूमिकेत जो व्यक्ती आहे , त्याचे ‘उल्लू’ ॲपवरील एका वेबसीरिजमध्ये नको ते कृत्य करतानाचे व्हिडीओ, क्लिप्स आहेत. अशा माणसाला घेऊन त्यांनी ( ठाकरे गटाने) महिला अत्याचारावरची जाहिरात कशी केली ‘ असा सवाल वाघ यांनी विचारला.
पब, पार्टी आणि पॉर्न अशी किळसवाणी संस्कृती रूजवायचा प्रयत्न
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ते कसली संस्कृती आणायचा प्रयत्न करत आहेत ? असे बाप जाहिरातीमध्ये वापरून तुम्ही ‘बाप’ असल्याचं महाराष्ट्राला दाखवणार आहात का ? असा खडा सवाल वाघ यांनी विचारला. महाराष्ट्रामध्ये पब, पार्टी आणि पॉर्न असा किळसवाणा प्रकार आणला जातोय, त्याबद्दल आम्हाला उद्धव ठाकरेंना जाब विचारायचा आहे असंही चित्रा वाघ म्हणाल्या.
ही जाहिरात तयार करणारी कंपनी कोणती, ही कंपनी कोणाची, त्याचा आणि या पॉर्न स्टारचा काय संबंध आहे ? या जाहिरात कंपनीचे आणि उद्धव ठाकरेंचे काय संबंध आहेत ? याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिलं पाहिजे, याचा तपास व्हायला पाहिजे असेही चित्रा वाघ यांनी म्हटले.