नकली वाघ बिथरले, घाबरून थयथयाट करू लागले, भाजप नेत्याचा ठाकरे गटावर हल्लाबोल
महाराष्ट्र हा सज्ञानी आणि चौकस आहे. उबाठाच्या प्रतिक्रिया आता बदलल्या आहेत. त्यांची बदललेली भूमिका ही मतांच्या लांगुलचालनासाठी आहे. मराठी, मुस्लीम असा प्रचार करायचा. पण आता महाराष्ट्र याचा बदला घेईल. आदित्य ठाकरे यांना याची उत्तरे द्यावी लागतील.
मुंबई : 2 ऑक्टोबर 2023 | युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांवरून ट्विट केल होते. या ट्विटनंतर शिंदे गट आणि भाजपने आदित्य यांच्यावर टीकेची झोड उठविली. यातच एका भाजप नेत्याने ‘कोथळा काढणारी वाघनखं परत येतायत. त्यामुळे पेंग्वीन कुटुंबाच्या पोटात दुखायला लागलंय अशी खोचक टीका केलीय. दक्षिण मुंबई मराठी माणसाची आहे. गेल्यावेळी अरविंद सावंत आमच्या मेहरबानीमुळे जिंकले. मुंबईतील लोकसभेच्या सर्वच्या सर्व ६ जागा आम्ही जिंकणार असा दावाही या नेत्याने केलाय.
महात्मा गांधी यांना अभिवादन करायचं असेल तर विरोधकांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’त सामिल व्हायला हवं होतं. हे नकली इंडिया अलाईन्सचे लोक बाहेर पडले आहेत त्यांनी गांधी विचारासाठी काय केलं? गांधीजींच्या नावावर इंडिया अलाईन्सवाले राजकारण करत आहेत. आम्ही गांधीजींचे विचार मोदीजींच्या नेतृत्वात पोहोचवत आहोत, असे भाजप आमदार आशिष शेलार यांनी सांगितले.
जे तुम्हाला जमलं नाही ते सरकारला जमलं
छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे ब्रिटनमधून आणण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार तिथे गेले. हे काही आम्ही मतांसाठी करत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा सन्मान होत असेल तर त्यात चूक काय? जे तुम्हाला जमलं नाही ते एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या सरकारला जमलं, असा टोला त्यांनी विजय वडेट्टीवार यांना लगावला.
दक्षिण मुंबई मराठी माणसाची
दक्षिण मुंबईची जागा ही पूर्वीपासून भाजपकडे आहे. युतीसरकारच्या काळात येथून भाजप खासदार निवडून येत होत्या. आता दोन वेळा अरविंद सावंत निवडून आले पण आमच्या मेहरबानीमुळे गेल्यावळी ते जिंकले. मात्र, यावेळी अरविंद सावंत यांचा पराभव होणार ही काळ्या पाटीवरची सफेद रेघ आहे. अरविंद सावंत यांचे कर्तुत्व नव्हतं. त्यामुळेच आज त्यांना मत मिळवण्यासाठी कबरीवर फेऱ्या मारायला लागताहेत. दक्षिण मुंबई मराठी माणसाची आहे. मुंबईतील सर्व ६ जागा आम्ही जिंकणार असा दावाही त्यांनी केला.
खासदार संजय राऊत हे दसरा मेळाव्यावरून काहीही बोलत आहेत. संजय राऊत हे लिहिताना चिलिम आणि बोलताना गांजी घेऊन बोलतात. शिवाजीपार्क विषयामध्ये मनपा जो काही निर्णय घेईल तो कायदेशीर रित्या घेईल असे शेलार म्हणाले.
घाबरल्यामुळे थयथयाट सुरु
आदित्य ठाकरे यांनी वाघनखावरून ट्विट केलं. कोथळा काढणारी वाघनखं परत येत आहेत. त्यामुळे पेंग्वीन कुटुंबाच्या पोटात दुखायला लागलंय. नकली वाघ पुरावे मागायला लागलेत. उबाठाचे लोक वारंवार छत्रपतींच्या इतिहासाबद्दल प्रश्न निर्माण करु पाहत आहेत. छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागत आहेत आणि हास्यास्पद विधान करत आहेत.
हे सगळे नकली वाघ आहेत. घाबरल्यामुळे त्यांचा आता थयथयाट सुरु आहे. पबमधले विषय आणि त्याचा थयथयाट रस्त्यांवर करायचा नसतो. महाराष्ट्रात असेही राजकारणी आहेत जे शिवरायांच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित करतायत. कुठल्या मतांसाठी हे पुरावे विचारत आहेत? कुठली मतं आदित्यजी यांना सिक्यूर करायची आहेत, असा सवालही शेलार यांनी केला.