स्वतःच्या अहंकारामुळे नॅनो गाडीमधील पक्ष बनला, भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांच्यावर ‘प्रहार’
काही लोक अहंकारात जन्माला आल्यामुळे अहंकारातच वावरतात. त्यामुळे उद्धव ठाकरे असे वक्तव्य करतात. त्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. जे स्वतःच्या वडिलांची भूमिका सोडून त्यांचे विचार पायदळी तुडवू लागले. त्यांना वडिलांच्या पक्षाचे नाव मागण्याचा अधिकारच नाही.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरु आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. तर इकडे भाजप नेते उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार करत आहेत. आज उद्धव ठाकरे अमरावतीमध्ये असून येथील जाहीर सभेत बोलताना त्यांनी आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो भाजपने अडीच वर्ष मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरवलं होता असे सांगत पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला. त्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केलाय. स्वतःच्या अहंकारापोटी नॅनो गाडीमध्ये स्वतःचा पक्ष बसवावा लागतोय अशी टीका केली. तसेच तुम्ही कुणासोबत काय व्यवहार केला हे माहित आहे अशा शब्दात हल्ला केलाय.
कोणत्याही सभेत गेले की आम्ही मर्दांचा पक्ष असा उल्लेख करतात. तुम्हाला कोणी विचारलं होतं का? कोणाच्या मनात शंका आहे का? तुम्ही स्वतःहून हे सांगण्याची गरज का पडते? तुमचा पक्ष मर्दांची अवलाद असेल तर तुमच्या सुपुत्राला वरळीचा राजीनामा द्यायला सांगा. वरळीमध्ये आमच्या मतांवर निवडून आलात. वरळीत राजीनामा देऊन निवडणूक लढवून दाखवा आणि स्वतःच्या जीवावर निवडून येऊन दाखवा असे आव्हान त्यांनी दिले.
आमदार अपात्रता नोटीस
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे विधानसभा अध्यक्ष कारवाई करत आहेत. त्यामुळे हा निकाल देण्यासाठी उशीर लागण्याचा प्रश्नच नाही. त्याचे नियम स्पष्ट आहेत. खोटं बोलणाऱ्यांना वाटतंय की ते उघडे पडतील, पण होणाऱ्या कारवाईला ते सामोरे जातील अशी परिस्थिती होईल असे माझे मत आहे. देशात कायदा नावाची गोष्ट आहे. सर्वोच्च न्यायालय आहे. कायदा व्यवस्था आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका करण्याचा ठाकरे गटाला अधिकार आहे. मात्र, कोर्टातून सत्यच बाहेर येईल असे ते म्हणाले.
त्यांच्यासोबत काय आणि कसा व्यवहार केला?
मी आणि माझे कुटुंब यापेक्षा उद्धवजींना वेगळा विचार नाही. मी आणि माझा मुलगा यापेक्षा सामान्य शिवसैनिकांबद्दल त्यांनी कधी विचार केला का? हा प्रश्न सामान्य शिवसैनिकांना पडला आहे. बाळासाहेबांसोबत ज्या शिवसैनिकांनी शिवसेना उभी केली त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरेंनी काय व्यवहार केला? लीलाधर डाके, मनोहर जोशी यांच्यासोबत उद्धव यांनी कसा व्यवहार केला ते आम्ही पाहिले आहे. तुमचं घर तुम्हाला का टिकवता आलं नाही? त्यामुळेच महाराष्ट्रात सर्वात अपयशी नेता म्हणून उद्धव ठाकरेंची ओळख आहे असे शेलार म्हणाले.
उद्धव ठाकरे यांचा अभ्यास कच्चा
स्वतः मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे पक्षातील मंत्र्यांना एकत्र ठेवू शकले नाही. बाळासाहेबांनी भाजपला खांद्यावर घेऊन पुढे नेलं हे त्यांचे विधान म्हणजे त्यांचा अभ्यास कच्चा असल्याचे उदाहरण आहे. शिवसेना पक्षाच्या स्थापनेआधीही जनसंघ आणि भाजपचे नगरसेवक मुंबई महापालिकेत आहेत. ज्या शरद पवारांसोबत आज ते गुळपिट करता आहेत त्याच पवारांच्या मंत्रिमंडळात जनसंघाचे आमदार मंत्री राहिले होते. त्यामुळे तुमचा पक्ष येण्याआधी जनसंघ म्हणजेच भाजप कार्यरत होता असे त्यांनी स्पष्ट केले.